काँग्रेसच्या पाठपुराव्यातून मंजूर रु. दोन कोटींची कामे तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आयुक्तांच्या दालनात बैठक १५ दिवसांत टेंडर प्रसिद्ध करण्याचे आयुक्तांचे आश्वासन!
नालेसफाईची कामे वेगात पूर्ण करण्याची काँग्रेसची मागणी

अहमदनगर दि.१५ जून (प्रतिनिधी/ : महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पाठपुरावा करत राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रभागांतील विकास कामांसाठी रु.दोन कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. शासनाचा तसा जीआर जारी करण्यात आला आहे. ही कामे तातडीने सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त शंकर गोरे यांची समक्ष भेट घेत दालनात बैठक केली.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने महापालिका अंतर्गत मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत दि. ३० मार्च २०२२ रोजी शहरातील विविध प्रभागांमध्ये वीस कामांसाठी रु. दोनशे लक्षांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी काळे यांनी मंत्री ना.थोरात यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करत शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामध्ये रस्त्यांची कामे, मंदिरांची कामे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी बाकडे बसविणे, समाज मंदिरांची कामे, प्रोफेसर कॉलनी तसेच भिस्तबाग चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यासारख्या अनेक कामांचा समावेश आहे.
शासनाच्या वतीने या कामांना मंजुरी मिळून सुमारे अडीच महिने लोटले तरी देखील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही हालचाल याबाबत करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिष्टमंडळाने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तां समवेत बैठक करत सदर कामांच्या मनपा व अन्य संबंधित स्तरावरील मान्यतेची प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीने करून कामांना तातडीने सुरुवात करावी अशी मागणी केली आहे. सदर कामांसाठी राज्य शासनाने ७५ टक्के निधी मंजूर केला असून २५ टक्के निधी हा महानगरपालिकेला यासाठी उपलब्ध करून द्यावयाचा आहे. तो महापालिकेच्यावतीने तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. याकामी दिरंगाई होऊन शहरातील नागरिक सदर कामांपासून वंचित राहणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यावी असे यावेळी काळे यांनी म्हटले आहे.
आयुक्तांनी याबाबत पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व बाबींची पूर्तता करून या कामांच्या टेंडर संदर्भातची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी म्हटले आहे. काळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष जरी महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदांवर सत्तेत नसला तरी देखील शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून शहरातील विकासकामांना गती देण्याचे काम काँग्रेस करीत आहेत. त्याचबरोबर लोकांच्या मनातली खरा विरोधी पक्ष म्हणून नागरी समस्यांबाबत सक्षम दबावगट म्हणून देखील काँग्रेस काम करीत असून विकासासाठी वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम काँग्रेस करीत आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी अनिस चुडीवाला, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, नगरसेवक इंजि. आसिफ सुलतान, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे संजय भिंगारदिवे, इंजिनीयर डांगे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📌 *नालेसफाईची कामे वेगात पूर्ण करा :
मान्सूनला लवकरच सुरुवात होत आहे. पाऊस सुरू झाला की शहरातल्या अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात थेट गटारीचे पाणी शिरत असते. हा गेल्या अनेक वर्षांचा शहरातील नागरिकांचा अनुभव आहे. यामुळे त्या कुटुंबांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. यासाठी शहरातील नाल्यांची साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. जेणेकरून गटारींमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही. तसे आदेश संबंधित यंत्रणांना देवून सदर कामे तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावीत, अशी मागणी आयुक्त गोरे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष काळे यांनी केली आहे.