शासकीय सेवा एक कुटुंबाप्रमाणे असते. बदली त्याचा अविभाज्य घटक – डॉ थोरबोले

कर्जत प्रतिनिधी : दि २८
शासकीय सेवेत काम करताना एक कुटुंब म्हणून सर्व जण वावरत असतात. त्यातील कोणाची बदली झाली तर तो सदस्य बदलून जाण्याचे दुःख त्या परिवारास कायम असते. त्या व्यक्तीची आणि त्याच्या कार्याची उणीव कायम जाणवत राहते. तीच उणीव त्याच्या चांगल्या कामाची पावती असते असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले. ते कर्जत तलाठी सुनील हसबे यांच्या बदली निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी डॉ थोरबोले म्हणाले की, शासकीय सेवा प्रत्येकाची त्या गावात- शहरात मर्यादित कालावधीसाठीच असते. बदली सेवेचा एक भाग असून तो अधिकारी-कर्मचाऱ्याच्या जीवनात येत राहतो. मात्र त्याचे कार्य लोकाभिमुख असेल तर तो अधिकारी अथवा कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कायम राहतो. कर्जत तलाठी सुनील हसबे यांचे देशसेवेतील कार्य आणि महसुल विभागातील काम उपविभागात अविस्मरणीय राहिले आहे. त्यांना पुढील कार्यास विभाग प्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार नानासाहेब आगळे म्हणाले की, प्रशासकीय सेवेत बदली अविभाज्य घटक असून प्रत्येकाच्या कार्यकाळात तो मर्यादित कालावधीनंतरच येतो. मात्र ती व्यक्ती या जागेवरून गेल्यानंतर त्याची उणीव त्या विभागाला प्रकर्षाने जाणवत असते. अशीच उणीव कर्जत शहर आणि महसुल विभागाला तलाठी हसबे यांची जाणवत राहील. त्यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांसाठी भरीव होते. हसबे यांनी महसुल विभागासह सैन्यात देशसेवेचे कार्य उल्लेखनीय आहे. यावेळी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, अव्वल कारकून रवींद्र बेलेकर, मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रीक आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी श्रीरंग अनारसे यांनी केले तर आभार यांनी मानले.
**** कर्जत सोडण्याचे दुःख – तलाठी सुनील हसबे
यावेळी सत्करास उत्तर देताना तलाठी सुनील हसबे भावुक झाले होते. कर्जत महसुल विभागात काम करत असताना सर्वांचे सहकार्य लाभले त्यामुळेच आपण उत्तम काम करू शकलो. आज बदली झाली कर्जत सोडण्याचे दुःख निश्चित आहे. कर्जतकराचे ऋण कधीच विसरू शकणार नाही.