शासनाद्वारे घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

अहमदनगर दि. 22 डिसेंबर:- सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासन अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत असते. सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतुन प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात सुशासन सप्ताहानिमित्त “सुप्रशासन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.
व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रकाश ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, मनपाचे अति.उपायुक्त श्री.पठारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले म्हणाले, सर्वसामान्य व्यक्तीचा प्रशासनाशी त्याच्या काही ना काही कामानिमित्त सातत्याने संपर्क येत असतो. विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य व्यक्तीचे प्रश्न, अडचणी त्यांच्या असलेल्या वेदना अधिक संवेदनशिलपणे अधिकाऱ्यांनी समजुन घेत प्रभावी उपाययोजना राबवून त्याची सोडवणूक व्हावी, अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्यांना कमी वेळेत अधिक जलदगतीने व पारदर्शकपणे सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होण्याची गरज असुन प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने तंत्रस्नेही बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत प्रशासकीय सेवेतील गत तीस वर्षाचे अनुभवही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यावेळी यावेळी विषद केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे. जनतेला जलदगतीने सेवा पुरविण्याबरोबरच कायद्याचे काटेकोरपणे पालन होण्याच्यादृष्टीने पोलीस, महानगरपालिका यासह विविध शासकीय कार्यालयांद्वारे या तंत्रज्ञानाचा अधिक सजगपणे वापर करण्यात येत असुन येणाऱ्या काळात ग्रामीण भागातही या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली असुन सर्वसामान्यांना कमी वेळात अधिक सेवा गतीमानतेने देण्यासाठी अधिकारी – कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञानावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेकडे केवळ नोकरी म्हणून न पहाता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते ही भावना मनाशी बाळगुन सर्वसामान्यांना न्याय देण्याच्यादृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रकाश ठोंबरे यांनी सुशासन विषयावर विविध उदाहरणासह सविस्तर अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी मानले.
कार्यशाळेसाठी महसूल सह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.