
अहमदनगर दि.२८ मे ( प्रतिनिधी): निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने २८ मे १४९० रोजी अहमदनगर शहराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे तज्ज्ञ आणि इतिहासकार हा दिवस नगरचा स्थापना दिन मानतात. या शहराला आजमध्ये ५३२ वर्षे पूर्ण झाली. या शहराला ऐतिहासिक इतिहास लाभला आहे, तो जपला जावा, अशी अपेक्षा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
नगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना अहमदनगर रेल्वे स्टेशन इमारतीची प्रतिमा भेट दिली. त्यावेळी पोलिस अधीक्षक पाटील बोलत होते.
ते म्हणाले, दख्खन विजयाचे स्वप्न हेच जीवनाचे ध्येय मानलेल्या बादशहा औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला ते शहर (ही जागा आलमगीर म्हणून ओळखली जाते.), चमकदार कामगिरी करणाऱ्या चांदबिबीचा गाव, मुलूखमैदान तोफ या ओतीव तोफेच्या निर्मितीसाठी त्याकाळात जगभर ओळखले गेलेले गाव, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जगप्रसिद्ध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाची सुरुवातही नगरच्या किल्ल्यातच झाली. या ऐतिहासिक आणि अलीकडच्या भक्कम संदर्भांनी नगरची ओळख अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जपणे गरजेचे आहे.
********
…तर नगरच्या वैभवाची नव्या पिढीला माहिती होईल
शहरात असलेल्या ऐतिहासिक वास्तू जपण्याचा आणि त्यांचा इतिहास योग्य पद्धतीने मांडल्यास नगरच्या वैभवाची नव्या पिढीलाही माहिती होईल, असे स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.