सैनिकी वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

अहमदनगर, दि.23 मे (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कोपरगांव येथील कोरोनामुळे बंद असलेली सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृहे 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी 13 जून 2022 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. माजी सैनिक, युध्दविधवा, माजी सैनिक विधवा व सेवेत कार्यरत सैनिकांच्या मुला-मुलींना या सैनिक वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संदीप विष्णू निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण व तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत असणा-या माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात तसेच युध्दविधवा, विधवांच्या सर्व पाल्यांना विनामूल्य आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येईल. इतर नागरिकांच्या पाल्यांना वसतिगृहात जागा शिल्लक असल्यास नियमानुसार फी आकारुन प्रवेश देण्यात येईल. वसतिगृहात आंघोळीसाठी गरम पाणी, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास अभ्यास करण्यासाठी इनव्हर्टर व संगणकावर काम करण्याची विनामूल्य संधी उपलब्ध आहेत.
प्रवेश अर्ज व अधिक माहीतीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, अहमदनगर (नगर कॉलेज समोर) फोन नं. 0241/2324143/9757429711, सैनिकी मुलींचे वसतिगृह 0241/ 2324155 /9921758914 व सैनिकी मुलांचे वसतिगृह श्रीगोंदा (शासकीय आरोग्य केंद्रा शेजारी) फोन नं. 02487/222099/9096426573 आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोपरगाव (खंडोबा मंदीर शेजारी, कोपरगांव) फोन नं. 0242/ 3227290 /8412971999 या वसतिगृहाचे अधीक्षक/ वसतिगृह अधीक्षिका यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करावेत. या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनी व तसेच इतरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.