न्यायालयीन

टँकर घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

अहमदनगर १० मे(प्रतिनिधी) पारनेर तालुक्यात झालेल्या टॅंकर घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे . पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पारनेर येथील साई सहारा इंफ्रा अँण्ड फॅसीलीटी प्रा . लि . या कंपनीला जिल्हा प्रशासनाने सन २०१८ – १९ मध्ये कंत्राट दिले होते . या कंपनीने पाणीपुरवठा करताना मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेने केला होता . पुढे या सामाजिक संस्थेने याबाबतची तक्रार जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे दाखल केली होती . त्यानंतर राज्य शासनाने घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती . या चौकशी समितीचा अहवाल उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आल्यानंतर ठेकेदार कंपनी विरोधात शासणाच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लोकजागृती या संस्थेने जनहीत याचिका दाखल केली होती . गुन्हा दाखल झाल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींना सत्र न्यायालयाकडुन तात्पुरता अटकपूर्व जामीन दिलेला होता . तो कायम करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता .
या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांनीही या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणारा हस्तक्षेप अर्ज न्यायालयासमोर दाखल केला होता . पोलिसांनीही या प्रकरणात
बनावटगीरीची वाढीव कलमे लावुन आरोपींचा अटकपूर्व जामीन कायम करण्याला विरोध केला . अतिरीक्त सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांच्यासमोर याबाबत सुनावणी झाली . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने आज यातील सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे . बनावट कागदपत्रे तयार करून सार्वजनिक निधिचा अपहार करणे , शासणाची फसवणून करणे असे गंभीर आरोप आरोपींविरोधात आहेत . आरोपींकडुन गुन्ह्यासाठी वापरलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे . आरोपींनी पुरावे नष्ट करू नये तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव आणू नये म्हणून व गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्यामुळे तो कसा घडवला याबाबत तपासात पोलिसांना आरोपींच्या कोठडीची गरज असल्याचे म्हटले आहे .
या गुन्ह्यातील आरोपींमध्ये सहारा कंपनीचा अध्यक्ष तथा राळेगण सिध्दी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा माजी सचिव सुरेश पठारे , कन्हैया दूध उद्योग समूहाचा संचालक मच्छिंद्र लंके ,राळेगणसिद्धी येथील आदर्श ग्रामीण पतसंस्थेचा उपाध्यक्ष दादाभाऊ पठारे , पारनेर
नगर पंचायतीचा बांधकाम समिती सभापती नितीन अडसुळ ,शिरुर नगर परिषदेचा नगरसेवक विठ्ठल पवार , राळेगण सिध्दी येथील उद्योजक विठ्ठल गाजरे , पारनेर येथील उद्योजक अभय औटी यांचा समावेश आहे . मूळ तक्रार लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने जेष्ठ वकील नवनाथ गर्जे तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे