माजीमंत्री राम शिंदेना विधान परिषदेत संधी द्यावी

कर्जत (प्रतिनिधी) : दि २१ एप्रिल
अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात पक्ष मजबुतीसाठी माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी गळ अहमदनगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली. आगामी मे व जून महिन्यात होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजीमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी नगर जिल्ह्यातून करण्यात आली.
कर्जत-जामखेड मतदारसंघासह नगर दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते प्रस्थ यासह आ रोहित पवार यांची राजकीय वाढती ताकद पाहता माजीमंत्री राम शिंदेची विधान परिषदेवर वर्णी आवश्यक असल्याचे मत स्थानिक भाजपा आणि नगर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. यासह राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी राम शिंदेची निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देखील माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेनी राम शिंदेना विधान परिषदेची संधी मिळावी असा ठराव मांडत मागणी केली होती. या ठरावाची प्रत देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनिल पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू धोदाड आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
**** राम शिंदे फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार
नगर जिल्ह्याच्या प्रभारीपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वाढते प्रस्थ यासह आ रोहित पवार यांची मतदारसंघातील लोकप्रियता पाहता त्यांना शह देण्यासाठी राम शिंदेना विधान परिषदेत संधी दिल्यास भाजपाला मोठा आधार मिळेल असा विश्वास भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. यासह राम शिंदे फडणवीस याचे विश्वासू शिलेदार असल्याने त्यांची बाजू इतरांपेक्षा वरचढ राहणार आहे.