दादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला अध्यासन व प्रशिक्षण केंद्र

कर्जत प्रतिनिधी : दि ११ मार्च
रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला अध्यासन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणार असल्याची घोषणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केली. सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपप्राचार्य डॉ. महेंद्र पाटील, प्रा भास्कर मोरे, सांस्कृतिक मंडळाचे चेअरमन डॉ प्रमोद परदेशी , डॉ संतोष लगड, डॉ संदीप पै, प्रा प्रकाश धांडे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ नगरकर म्हणाले की, फुले कालीन स्री जीवन अतिशय कष्टाचे व दुय्यम दर्जाचे होते. अशा काळात महात्मा फुले यांनी १८४८ साली पुणे येथे मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी शिक्षका म्हणून काम केले. समाजसुधारक वृत्तीमुळे समाजाचा रोष या दांपत्यास पत्करावा लागला. मात्र त्यांनी हा त्रास सहन करून आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच ठेवले. म्हणून स्री शिक्षणाला ,स्री समानतेला व जागरणाला हातभार लागला. या पार्श्वभूमीवर आजच्या काळाची गरज व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला अध्यासन व प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे म्हंटले. याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थिनींबरोबरच बाहेरील महिलांसाठीही रोजगारभिमुख प्रशिक्षण, साक्षरता अभियान, महिला सबलीकरण संदर्भात कार्यशाळा, आरोग्य संवर्धन, सांस्कृतिक व वैचारिक जडणघडण, महिलांविषयक साहित्याचा अभ्यास व संशोधन अशा स्वरुपाचे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविणार असल्याचे सांगितले. या अध्यासनाचे प्रमुख म्हणून डॉ भारती काळे काम पाहतील अशी घोषणा केली. सांस्कृतिक मंडळाचे डॉ प्रमोद परदेशी यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.