शेतीमध्ये ड्रोन वापरासाठी उद्योजक तयार होणे काळाची गरज – डॉ. पाटील

राहुरी /प्रतिनिधी — भारतातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे एकमेव विद्यापीठ असे आहे की जेथे ड्रोनची सुसज्य प्रयोगशाळा आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर करुन शेतीची उत्पादकता वाढविली जावू शकते, यासाठी गावातील तरुणांनी ड्रोन तंत्रज्ञान आत्मसात करुन उद्योजक होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन उक्कलगांव, ता. श्रीरामपूर येथे मच्छिंद्र पाटील थोरात यांच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले होते. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल पवार, तंत्र अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी पांडुरंग साळवे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, उक्कलगावचे सामाजीक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी व अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रभान पाटील थोरात व उक्कलगाव येथील शेतकरी उपस्थित होते. यावेळी डॉ. सचिन नलावडे यांनी उपस्थितांना ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्व, गरज आणि फायदे तोटे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. गिरीषकुमार भणगे यांनी कांदा पिकावर ड्रोनद्वारे किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक दिले व उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन केले.