सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कर्जत प्रतिनिधी : दि १९
कर्जत शहर आणि तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्जत प्रशासनातील सर्व अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे यांनी शिवजन्मोत्सव निम्मित आयोजित राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
कर्जत शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १०:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते अश्वारूढ शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयघोषणांनी परिसर दुमदुमला होता. शिवजयंतीनिम्मित कर्जत बसस्थानक परिसर भगवामय झाला होता. यावेळी शिवकन्या नवले हिने शिववंदना म्हंटली. यासह भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर प्रवेशद्वार याठिकाणी अजय भैलुमे मित्रमंडळ तर जामा मशीद कर्जत सकल मुस्लिम समाज आणि निगाहे करम यंग ग्रुपच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. संध्याकाळी ५ वाजता पारंपरिक वाद्यसहित बँडपथक, कल्याण ढोल, शिवकालीन प्रात्यक्षिक आणि घोडे-उंट स्वार छत्रपती शिवाजी महाराज, माँ साहेब जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेत भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने मागील सात दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिम्मित “सिनथडी जत्रा” आयोजित करून उत्पादक आणि ग्राहक यांना विविध बचतगटाद्वारे बाजारपेठ उपलब्ध केली होती. शुक्रवार, दि १८ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यासह शनिवारी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्यावतीने यंदा विविध सामाजिक उपक्रम राबवित शिवजयंती साजरी करण्यात आली.
**** शिवजयंती मिरवणुकीत सर्व धर्म समभावचे दर्शन
संध्याकाळी सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. याप्रसंगी बसस्थानक परिसरातील जानपीर बाबा आणि गारपीर बाबा दर्गाहच्या मजारीवर सकल मराठा समाजाच्यावतीने चादर अर्पण करण्यात आली. तर सकाळी जामा मशीद ठिकाणी शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले होते. तर मिरवणुकीसाठी शेर ए सुलतानच्यावतीने शिवप्रेमीसाठी सरबत वाटप करण्यात आले.