विद्यार्थी व शेतकरी वर्गासाठी रेडीओचे योगदान महत्वाचे – मिलिंद अहिरे

राहुरी / प्रतिनिधी — सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्वीटर, इंन्टाग्राम या सारखी समाज माध्यमांची संख्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी उपलब्ध आहेत. परंतु या सर्वामध्ये रेडीओचे स्थान अढळ असे आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ग्रामीण भागातील युवक, महिला तसेच शेतकरी वर्गामध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमांना मोठी पसंती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व्यक्तीमत्व विकासाबरोबरच शेतकर्यांच्या शेतीविषयक माहितीसाठी व करमणूकीसाठी रेडीओचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विस्तार व संज्ञापन विभाग व पदव्युत्तर महाविद्यालय यांचे अनुसुचित जाती विशेष पॅकेज अंतर्गत रेडीओ जॉकी संदर्भात दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरुन डॉ. अहिरे बोलत होते. यावेळी विस्तार विभागाचे डॉ. गोरक्ष ससाणे, अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे, निवेदक शशिकांत जाधव, निवेदिका सौ. विना दिघे, प्रसारण केंद्राचे अधिकारी डॉ. सचिन सदाफळ व डॉ. ज्ञानदेव फराटे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. अहिरे पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रेरणेने व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच विद्यापीठात कम्युनिटी रेडीओ व त्यानंतर ब्रॉडकास्ट चॅनेल सुरु करणार आहोत. यावेळी सुदाम बटुळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कम्युनिटी रेडीओमुळे विद्यार्थ्यांनमधील सुप्त गुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासासाठी योग्य दिशा देण्याचे काम रेडीओवरील वेगवेगळ्या मुलाखतीसारख्या कार्यक्रमातून होतो. याप्रसंगी शशिकांत जाधव व सौ. विना दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दोन दिवस चालणार्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, राहुरी विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, मुंबई आकाशवाणी केंद्राचे अधिकारी संतोष जाधव, अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे निवेदक शशिकांत जाधव, निवेदिका सौ. विना दिघे, सोनई कृषि महाविद्यालयाचे प्रा. सुनिल बोरुडे, बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या कम्युनिटी रेडीओच्या रुपाली घोडके हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील १५० पेक्षा जास्त विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. गोरक्ष ससाणे यांनी मानले. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मनोहर धादवड, राजु राठोड, डॉ. पद्मकुमार पाटील व विश्वनाथ तोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.