राजकिय

वयोश्री योजनेत ज्येष्ठांना साहित्य वाटपात अहमदनगर जिल्हा देशात प्रथम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०० ज्येष्ठांना साधन-साहित्याचे वाटप

शिर्डी, दि.२० ऑगस्ट (प्रतिनिधी) राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे जिल्ह्यात यशस्वीपणे वाटप झाले आहे‌. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे अहमदनगर जिल्हा देशात पहिल्या क्रमांकांवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’ तील लाभार्थ्यांना राहूरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथे साधन साहित्याचे वाटप महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, डाॅ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू, आप्पासाहेब दिघे, दिपक पाटील, सुभाषराव अंत्रे, नानासाहेब गागरे श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार कुंदन हिरे, राहुरीचे तहसीलदार फैज्जुदीन शेख उपस्थित होते.
महसूलमंत्री मंत्री श्री.विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध गावांमधील ७०० हून अधिक जेष्ठ नागरिकांना साधन साहित्याचे वितरण करण्यात आले. आता पर्यत अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नोंदणी नूसार १६ हजार लाभार्थीना साधन साहित्य देण्यात आली असल्याची माहिती श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ कार्यान्वित झाली. खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे या योजनेस जिल्ह्यात सुरूवात झाली. तालुकानिहाय नोंदणी पूर्ण करून मंजूर झालेल्या लाभार्थीना साधन साहित्य आता वितरीत होत असून जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी करुन जेष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्य़ाचा नावलौकीक देशात झाला आहे.
कोव्हीड संकटात या देशातील जनतेला सर्व स्तरावर शासनाचा आधार मिळाला. या संकटाने रोजगार बंद झाल्याची जाणीव ठेवून देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. कोव्हीड लसीचे उत्पादन देशातच व्हावे. यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली. लसीचे उत्पादन यशस्वीपणे झाल्यामुळेच देशातील २०० कोटी नागरिकांना मोफत डोस मिळाले. स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव लक्षात घेवून ७५ दिवसांचा तिसऱ्या मोफत वर्धक मात्रा (बुस्टर डोस) देण्याची मोहीमही सुरू असून सर्वच नागरिकांनी वर्धक मात्रा (बुस्टर डोस) घेण्याचे आवाहन ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केले.
नागरिकांच्या हिताचे निर्णय करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. राज्यात अतिवृष्टीत नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून ३ हेक्टर मर्यादेपर्यत मदत करण्याचा निर्णय घेतला असून एनडीआरएफच्या तरतुदीपेक्षा ही मदत दुप्पट आहे‌. केंद्र सरकारने सुध्दा देशातील शेतकऱ्यांसाठी ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाकरिता अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. असेही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे