आ रोहित पवार यांच्या हस्ते विद्यार्थिनीसाठी “तेजस्विनी बस” चा शुभारंभ

कर्जत( प्रतिनिधी ):
बारामती ऍग्रो आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या देणगीतून रक्षाबंधन निम्मित आ रोहित पवार यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात कोपर्डी-शिंदे-वालवड ते दादा पाटील महाविद्यालय येथील विद्यार्थिनीच्या वाहतुकीसाठी “तेजस्विनी बस” चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत कौन्सिलचे अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, प्राचार्य डॉ संजय नगरकर, नगराध्यक्षा उषा राऊत आदी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थिनीनी आ पवार यांना राखी बांधली.
यावेळी बोलताना आ पवार म्हणाले की, रक्षाबंधनाचे औचित्य साधत आज दादा पाटील महाविद्यालयाच्या कोपर्डी आणि त्यालगतच्या गावातील विद्यार्थिनीसाठी तेजस्विनी बस सुरू करण्यात आली आहे. यासह कोरोनानंतर अजून काही ठिकाणी बससेवा उपलब्ध नाही. तेथील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कर्जतला येताना असंख्य अडचणी निर्माण होत आहे असे निदर्शनास येत असून त्या गावाची प्राचार्यानी यादी करावी. त्या विद्यार्थिनीसाठी आणखी एक बस उपलब्ध करू असा शब्द आ रोहित पवार यांनी दिला. आज माझ्या या बहिणींनी राखी बांधल्याने या भावाची बहिणीप्रती आणखी जबाबदारी वाढल्याचे म्हंटले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर, रयत मॅनेजिंग कौन्सिलचे राजेंद्र फाळके यांची भाषणे झाली. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा ठाण्याचे पोलीस अधिकारी संजय निंबाळकर, रापमचे संजय खराडे, बाप्पाजी धांडे, कोपर्डीचे सरपंच संदीप सुद्रीक, पालक प्रतिनिधी वंदना घालमे, यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका आणि शिक्षक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.