मुक्त, नि:पक्षपाती तसेच निर्भयपणे मतदान करत लोकशाहीचे जतन करावे:- अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर दि. 25 जानेवारी (प्रतिनिधी) :- भारत हा लोकशाही मुल्यांची जपवणूक करणारा जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. प्रत्येक मतदाराने मुक्त, नि:पक्षपाती तसेच निर्भयपणे मतदान करत लोकशाहीचे जतन करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. मापारी बोलत होते.
व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील, उप विभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास,
परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी पदमाकर गायकवाड, तहसीलदार उमेश पाटील, चंद्रशेखर शितोळे, परिविक्षाधिन तहसीलदार हेमंत ढोकळे, डॉ. संजय कळमकर, नायब तहसीलदार श्री. बारवकर, प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. मापारी म्हणाले, आपल्या देशात निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून ही लोकशाही अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. लोकशाही अधिक सशक्त करण्यासाठी प्रत्येक नवमतदाराने मतदार म्हणून नोंदणी करत आपल्या मतदानाचा हक्क बजवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात तहसिलदार उमेश पाटील यांनी मतदार दिन साजरा करण्यामागची भूमिका विशद करत प्रत्येक मतदारांने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
डॉ. संजय कळमकर यांच्यासह शालेय विद्यार्थीनींही आपले मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विजयकुमार नेटके, रमेश अल्हार अनिल देवकर या कर्मचाऱ्यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार नायब तहसिलदार श्री. बारवकर यांनी मानले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्राध्यापक यांच्यासह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.