भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न :डॉ सुनिल कवडे
कृषी विद्यापीठात महामानव डॉ. आंबेडकर जयंती साजरी

राहुरी दि.१४ (प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीकारी विचार हे केवळ आपल्या देशात सिमीत करुन चालणार नाही तर ते संपूर्ण जगासाठी आणि मानव कल्याणासाठी आहेत. म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. सुनिल कवडे यांनी केले
ते महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, हळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान आणि क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान या विषयावर बोलतांना डॉ. सुनिल कवडे पुढे म्हणाले की बाबासाहेबांकडे प्रचंड ज्ञानसंपंन्नता होती, खडतर परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले आणि या ज्ञानाचा उपयोग त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी केला. त्यांची तुलना केवळ कार्ल मार्क्स या प्रख्यात विद्वानाशीच होऊ शकते. बाबासाहेबांनी राजकीय तसेच सामाजिक आणि अर्थशास्त्राच्या संबंधी अनेक विचार मांडले व अथक परिश्रमातून भारताची राज्यघटना तयार केली. त्यांच्या मते सामाजिक लोकशाही हा राजकीय लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापीत करण्याची खरी गरज आहे. समाजाने मानसिक गुलामगिरी बाजूला ठेवून संशोधक वृत्ती आणि मानवी प्रतिष्ठा व मानवी कल्याण जोपासण्याची आज खरी आवश्यकता असल्याचे मत डॉ. कवडे यांनी मांडले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की भारतामध्ये अनेक महापुरुष झाले, परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव सुवर्णअक्षराने लिहिले जाईल. ते केवळ राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते तर एक शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, प्रसिध्द कायदेपंडीत, उत्कृष्ट संसदपटू आणि प्रभावी वक्ते होते. त्यांनी समाजक्रांतीचे बीज रोवले आणि समाजात जागृती केली व नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी महिला तसेच शेतकरी, शेतमजूर आणि श्रमजीविंसाठी कार्य केले. डॉ. आंबेडकर यांनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना त्या काळी मांडली जेणेकरुन पिकांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्याचप्रमाणे कमाल जमीनधारणा कायदा, शेती महामंडळाच्या जमिनीवर बिजोत्पादन घेणे आणि सावकारी कर्ज पध्दतीला विरोध दर्शविला आणि सामाजिक ऐक्यासाठी कार्य केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे ओळख विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे कृषि महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण निदेशक प्रा. पुष्पशील शेळके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी श्री. रणजीतसिंह जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.