प्रत्येकाने स्वच्छतेची शिकवण आचरणात आणल्यास आपला संपूर्ण देश स्वच्छ होईल — डॉ. मिलिंद अहिरे

राहुरी / प्रतिनिधी —
गाडगेबाबा हे फक्त संत नव्हते तर ते एक मोठे समाज सुधारक होते. त्यांच्या हयातीत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेविषयी समाजामध्ये जागृती निर्माण केली. रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याचे मोठे कार्य संत गाडगेबाबा यांनी केले. स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आपल्या आचरणात आणल्यास व त्याची सुरुवात आपल्या घरापासून केल्यास आपले राज्य व संपूर्ण देश स्वच्छ होईल असे प्रतिपादन हाळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने स्वच्छ भारत अभियान व संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव या महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहात स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अहिरे बोलत होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाची स्वच्छता विद्यार्थी व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुपारी 4.00 वाजता केली, त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाची स्वच्छता महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांचे उपस्थितीत करण्यात आली. सकाळी 11.00 वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात डॉ. अहिरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी विकास ठाकूर हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. मनोज गुड यांनी मानले . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.