लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज – पालकमंत्री हसन मूश्रीफ
लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त करा- प्रशासनाला सूचना

अहमदनगर, दि.25 (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या जरी वाढत असली तरी मृत्युसंख्या कमी आहे. रूग्ण घरीच बरे होत आहेत. रूग्णांना प्राणवायूची आवश्यकता फारच कमी प्रमाणात लागत आहे. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास,कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी 19 कोटी 83 लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अशी माहिती ही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
‘ओमायक्रान’ या कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा प्रशासनाची कोरोना आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे तसेच जिल्ह्यातील इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते .
श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, आज लसीकरणामुळे मृत्यू संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लस उपयोगी ठरत आहे. तरीही आपणास गाफील राहून चालणार नाही. यासाठी प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. त्याच बरोबर जनतेने ही शारीरिक अंतर ठेवणे, मुखपट्टीचा वापर करणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा कायम वापर केला पाहिजे.यासाठी आरोग्य विभागाने जागृती करावी. अशा सूचनाही श्री.मुश्रीफ यांनी दिल्या.
श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, 15 ते 18 वर्षे वयोगटातील 80 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांतील जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा. असे नमूद करून ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार प्रमाणे आतापर्यंत 33 कोटी 19 लाखांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे. अशा सूचना ही श्री.मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी 19 कोटी प्राप्त झाले आहेत. यात जिल्हा रूग्णालयातील 60 बेड्सच्या अतिदक्षता विभागासाठी 10 कोटी, घोडगांव ग्रामीण रूग्णालयाच्या 20 बेड्सच्या अतिदक्षता विभागासाठी 3 कोटी 36 लाख, लहान मुलांच्या 42 बेड्सच्या अतिदक्षता विभागासाठी 2 कोटी 65 लाख आणि उर्वरित निधी हा प्रत्येक ग्रामीण रूग्णालयातील रूग्णवाहिकेत इंधन भरण्यासाठी असणार आहे. तेव्हा प्रशासनाने शक्य असेल अशा ठिकाणी कोवीड केअर सेंटर पुन्हा सुरू करावेत.अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सांगळे यांनी यावेळी जिल्ह्यातील करोना चाचण्या, लसीकरण, दैनंदिन रूग्णसंख्या, मुत्युदर, सक्रीय रूग्ण, पॉझिटिव्हीटी रेट याबाबत माहितीचे सादरीकरण केले.
बैठकीपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने सुरू केलेल्या ‘ई-टपाल उपक्रमा’ची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.