राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती सामाजिक कार्यक्रमाने व भव्य मिरवणूक काढून साजरी करणार – सुरेश बनसोडे

अहमदनगर दि.११ (प्रतिनिधी)- गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट राज्य-देशच नव्हे तर संपूर्ण जगावर होते. त्या अनुषंगाने शासनाने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विविध निर्बंध लावले होते. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी अनुयायांना साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी राज्यसरकारने सर्व निर्बंध हटविल्याने त्याच उत्साहात व दिमाखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच गुरुवार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्केट यार्ड अहमदनगर याठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करून दुपारी. ०४ वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मिरवणुकीत ट्रॉलीवर महामानव.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास दिमाखदार सजावट केली असून आकर्षक रोषणाई असणार आहे, मिरवणुकीत जिल्ह्याभरातून शेकडो भिम सैनिक सामील होणार असून. अत्यंत उत्साहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी जाहीर केले आहे.