रिपाईच्या वतीने महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिन सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन; जय भीमचा गजर हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -विवेक भिंगारदिवे

अहमदनगर दि. 20 मार्च (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सार्वजनिक चवदार तळे येथे केलेल्या सत्याग्रह दिन सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शहराच्या मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण जय भिम…च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, तालुका उपाध्यक्ष अजय आंग्रे, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे,गौरव भिंगारदिवे, करण भिंगारदिवे,शुभम ठोंबे, संकल्प बडेकर,शैलेश भिसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक भिंगारदिवे म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याच्या ठिकाणी सत्याग्रह करुन अस्पृश्यांना तळे पिण्याच्या पाण्यासाठी खुले केले. या सत्याग्रहातून त्यांनी खरा माणुसकी धर्म शिकवला. धर्मातील भेदभाव, अस्पृश्यता, उच्चनिचता संपवून त्यांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास समाजातील अस्पृश्यता व जातीच्या उतरंडी संपणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अविनाश भोसले म्हणाले की, समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांनी योगदान दिले. इतिहासात समता, स्वातंत्र्यासाठी आंदोलनं झाली, पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि अस्पृश्यतेचा द्वेष संपविण्यासाठी महाड येथील चवदार तळ्याचे सत्याग्रह झाला होता. बाबासाहेबांचे योगदान व प्रत्येक संघर्ष समाजातील अस्पृश्यता व जातीय विषमता मोडून काढण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.