सोन्याचा टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले गेले कुठे? वंचित बहुजन आघाडीचा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना सवाल!

अहमदनगर: (प्रतिनिधी)- सोन्याचा टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले गेले कुठे? असा सवाल अहमदनगर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे, शहर अध्यक्ष संजय जगताप,शहर महासचिव सचिन पाटील,शहर सचिव भाऊ साळवे,भिंगार अध्यक्ष जे. डि.शिरसाठ,योगेश गायकवाड,अमोल काळपुंड,पोपट जाधव,बबलू भिंगारदिवे,राजीव भिंगरदिवे,अशोक कदम समीर शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिलशहा चा सरदार मुरार जगदेव याने गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त केलेलं पुणे माता जिजाऊनी बाल शिवराय यांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचे भाग्य उजळवून स्वराज्याची वाटचाल विकासाकडे केली,तीच प्रेरणा घेऊन अहमदनगर जिल्ह्याचा विकास करण्याच्या हेतूने अहमदनगर शहरातील २५ वर्षे रखडलेला उड्डाण पूल भूमिपूजन वेळी देखील सोन्याचे टिकाव,खोरे आणि चांदीच घमेले यासर्व वस्तूंचा भूमिपूजन वेळी वापरण्यात आलेले होते.
स्वर्गवासी खासदार दिलीप गांधी,माजी आमदार शिवाजी कर्डिले,माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी विधिवत भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला होता. स्वर्गवासी खासदार दिलीप गांधी,माजी आमदार शिवाजी कर्डिले,माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या भूमिपूजन वेळी तयार केलेलं सोन्याचं टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले तयार केले होते ते आज मितीला कोणाच्या ताब्यात आहे? एव्हढे सोन चांदी आणले कोठून? त्यावेळीही केंद्रात आणि राज्यात भाजप सत्ता होती आणि आजही आहे.जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या सोन्याचा नांगर पेशवाई काळात गायब करण्यात आला आहे आज तीच विचारांची पेशवाई भाजप नावाने सत्तेत आले आहे.याच सत्ताधारी पेशवाई भाजपच्या काळात या उड्डाण पुलासाठी वापरले गेलेले सोन्याचं टिकाव,खोर आणि चांदीचे घमेले गेले कुठे? २५ वर्षे रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण होणार आहे त्याचे श्रेय हे जनता २०२४ ला निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून मिळेलच, पूर्ण झालेला पुल हा सर्व सामान्य जनतेच्या कर रुपात भरलेल्या पैशातून उभारला आहे त्याचे कोणीही फुकटचे श्रेय घेऊ नये. उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मंत्री गडकरी यांनी प्रामाणिकपणे भारताच्या विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्ह्याला देखील पुल मंजूर करून देत त्याचे काम आता पूर्ण होत आलेले आहे. सोन्याचं टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले या वस्तू भूमिपूजन वेळी वापरण्यात आल्या होत्या या गोष्टीला ते सुद्धा साक्षीदार आहेत त्यांनी देखील या वस्तू गेल्या कुठ याचा खुलासा करावा किंवा पुलाच्या उद्घाटन वेळी येताना घेऊन येण्याची तसदी घ्यावी. परंतु, त्याधीच भाजप,शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यात श्रेय घेण्यासाठी जणूकाही स्पर्धाच लागलेली आहे याच श्रेयवाद्यानी सोन्याचा टिकाव,खोरे आणि चांदीचे घमेले याचा देखील शोध घेत खुलासा करून जनतेच्या हवाली करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर च्या वतीने करण्यात आली.