विद्यार्थी दशेतच जीवनाचे ध्येय निश्चित करा : डॉ. दीप्ती करंदीकर स्नेहबंध फौंडेशन आयोजित केशवराव गाडीलकर विद्यालयामध्ये व्याख्यान

अहमदनगर (प्रतिनिधी) -ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येकाने झोकून देऊन प्रामाणिकपणे काम केल्यास जिवनात यश निश्चित मिळते. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय मोठेपण येत नाही. चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. विद्यार्थी दशेतच जीवनाला आकार मिळतो. त्यामुळे विद्यार्थी दशेत असतानाच जीवनाचे ध्येय निश्चित करा, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीप्ती करंदीकर यांनी केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सावेडी येथील केशवराव गाडीलकर हायस्कूल येथे आयोजित व्याख्यानात डॉ. करंदीकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे हे होते. यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, मुख्याध्यापिका मनीषा बनकर, जयश्री देशपांडे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. करंदीकर म्हणाल्या, व्हॉटस अॅप, मोबाइलवर खेळणे कमी करा, कष्ट करण्यानुसार फळ मिळते. शिक्षकांचे ऐका, त्यांचे ऐकल्यास चांगले फळ मिळेल. आयुष्यात प्रत्येकाने ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी. अभ्यासासाठी नियोजन करा. ज्याची भिती वाटते, त्यात आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. भिती दूर केल्यास स्वत:मध्ये आत्मविश्वास येतो, व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमाविषयी खूप कौतुक केले. यापूर्वीही अनेक कार्यक्रम फौंडेशन तर्फे विद्यालयात राबविण्यात आले आहे. विद्यालयातील परिसरामध्ये वृक्षारोपण, औषधी वनस्पती उद्यान, गांडूळ खत प्रकल्प व इतर विविध उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे सचिव नामदेवराव गाडीलकर यांचे आभार मानले. विद्यालयातील विविध उपक्रम विषयी सविस्तर माहिती मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे यांनी दिली. मुख्याध्यापिका मनीषा बनकर यांनी आभार मानले.