चावला हाफ मर्डर प्रकरणी किरण काळेंचे एसपींना सतरा पानी निवेदन आ.जगतापांच्या मेंदूची तपासणी न्यूरोसर्जन खा.डॉ.विखेंकडून करून घ्यावी, काँग्रेसचा टोला राष्ट्रवादीकडून काळेंच्या अटकेच्या मागणीनंतर काळे पुन्हा कोतवालीत हजर

अहमदनगर दि. 2 जानेवारी 2024
(प्रतिनिधी) : तथाकथित हर्षद चावला हाफ मर्डर प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सिव्हील हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांना सतरा पानी निवेदन सादर केले आहे. शहर विभागाचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक खेडकर यांनी ते स्वीकारले. सुमारे दीड तास त्यांना ब्रीफिंग करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काळे हेच चावला प्रकरणाचे मास्टरमाईड असून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर काळे पुन्हा कोतवालीत सोमवारी हजर झाले. त्यांनी तपासी अधिकारी पिंगळे यांची देखील भेट घेत तपास कामी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी काळे यांच्यासह संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, उषा भगत, सुनीता भाकरे, गणेश चव्हाण, मुस्तफा शेख, रियाज सय्यद, सुनील क्षेत्रे, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसपींना काँग्रेसने दिलेल्या निवेदनात चावलावर हल्ला झालेला नसून हल्ला झाल्याचा केवळ बनाव रचल्याचा दावा केला आहे. काळे, झिंजे यांना या प्रकरणात गोवण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीने चावलाशी संगनमत करत रचल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्यकर्ता सुरज जाधव, सचिन दगडे, गौरव उर्फ बंटी परदेशी यांच्यावर चावलाशी संगनमत करत बनाव रचल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मास्टर माईंड खोसे यानी चावला याला तथाकथित हल्ला झाल्यानंतर स्वतःच्या गाडीत नेले. या प्रवासा दरम्यान काळे, झिंजे यांच्या विरोधात फिर्याद देण्याचा बनावाचा कट शिजवला, असे निवेदनात म्हटले आहे. झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे. म्हणूनच त्यांच पोलीस संरक्षण काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून चावला सातत्याने करत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण न काढण्याची मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे.
आमदारांनी पंटर पुढे करण्या ऐवजी हिम्मत असेल तर स्वतः पुढे यावे – गुंदेचा
या प्रकरणावरून राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत काळे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार शहर काँग्रेसने घेतला आहे. याबाबत बोलताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले, राष्ट्रवादीने काळे यांच्या अटकेची मागणी केली आहे. काळे स्वतः त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा हजर झाले आहेत. जर काळे राष्ट्रवादीच्या म्हणण्या प्रमाणे दोषी आहेत तर पोलीस त्यांना अटक का करत नाहीत ? काळे कुठेही पळून गेलेले नाहीत. जाणार ही नाहीत. काळे यांना न्यूरोसर्जन कडून मेंदूची तपासणी करून घेण्याचा सल्ला देणाऱ्या खोसे यांनी आ. संग्राम जगताप यांच्या मेंदूची तपासणी न्यूरोसर्जन असणाऱ्या मित्र खा.डॉ.सुजय विखे यांच्याकडून करून घ्यावी. विखे पाटील फाउंडेशनला ते अल्प दरात करून देतील. पाहिजे तर तपासणीचा खर्च काँग्रेस कार्यकर्ते वर्गणी करून आमदारांना देतील असा टोला गुंदेचा यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना लगावला आहे.
आयटी पार्क विनयभंग प्रकरणात देखील काळे यांच्या विरोधात आमदारांनी राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करायला लावला होता. त्यावेळी देखील राष्ट्रवादीचा अभिजीत खोसे हा स्वतः एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिलेला घेऊन खोटी फिर्याद देण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत होता. त्याचा तपास झाला असून सदर फिर्याद खोटी होती हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. काळे यांना राजकीय आयुष्यातून उध्वस्त करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सातत्याने वेगवेगळे बनाव रचले जात आहेत. आयटी पार्क विनयभंग बानाव देखील खोसे यानेच रचला होता. चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टरमाईंड देखील खोसे हाच आहे. तो आजी, माजी आमदार पिता, पुत्रांच्या सांगण्यावरूनच हे कृत्य करत आहे. म्हणूनच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आमदार पिता-पुत्रांच्या आयुर्वेद महाविद्यालया कार्यालय, महाविद्यालय परिसरातील फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कोण कोणत्या गुन्हेगारांचा वावर या ठिकाणी सुरू आहे, याचा तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदारांनी खोसे सारख्या घोटाळेबाज पंटर लोकांना पुढे करण्या ऐवजी हिंमत असेल तर स्वतः पुढे यावे, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.