कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 2 नोव्हेंबर (प्रतिनिधी ):- कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध या संयुक्त विशेष मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करत ही मोहिम यशस्वी व प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध या संयुक्त मोहिमेच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) डॉ.राजेंद्र खंडागळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ. अविनाश आहेर,वैद्यकीय अधिकारी जिल्हा न्युक्लियस टिम डॉ. ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारीडॉ. सुवर्णा गिते, श्रीमती संज्योत उपाध्ये, प्रविणकुमार साळवे ,डॉ. जायभाय आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्यात यावा. विशेष मोहिम कालावधीमध्ये जिल्ह्यात प्रत्येक घरोघरी जाऊन कुष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध घेण्यात यावा. सर्व्हेक्षणामध्ये संशयित आढळून आलेल्या रुग्णांची वेळेत तपासणी करण्यात यावी. आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधोपचार देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समित्यांच्या बैठका घेण्यात येऊन ही मोहिम अतिशय प्रभावीपणे राबवली जाईल, याचे काटोकोरपणे नियोजन करण्यात यावे. मोहिमेबाबत जनमानसांमध्ये पुरेशा प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. क्षयरुग्णांना औषधोपचारादरम्यान पूरक पोषणासाठी केंद्र शासनाकडून दरमहा पाचशे रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. हा निधी प्रत्येक रुग्णाला मिळेल यादृष्टीने दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोहिमेबाबत सहायक संचालक डॉ. राजेंद्र खंडागळे व डॉ. अविनाश आहेर जिल्हा यांनी विस्तृत माहिती दिली. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.