किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी हर्षद चावलावर अदखलपात्र गुन्हा दाखल खोटी बदनामी करणाऱ्यांना काळेंच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याचा सुद्धा विसर पडला हे दुर्दैवी – शिंदे

किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी हर्षद चावलावर
अहमदनगर दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ओबीसी काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांची बदनामी केल्या प्रकरणी ॲड. हर्षद मनोज चावलावर गुन्हा नोंद क्रमांक १९४७/२०२३ नुसार भा.द.वी. कलम ५०० प्रमाणे फौजदारी दंड संहितेच्या कलम १५५ अन्वये अदखलपात्र गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. तशी फिर्याद संजय झिंजे यांनी दिली आहे. दरम्यान, खोटी बदनामी करणाऱ्यांना काळेंच्या कुटुंबात त्यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद घटना घडल्याचा सुद्धा विसर पडला हे दुर्दैवी आणि वेदना देणारे असल्याचे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी म्हटले आहे.
फिर्यादीमध्ये झिंजे यांनी नोंदविलेली हकीकत अशी की, इसम नामे हर्षद मनोज चावला याने वकिलाचा पोशाख घालून विविध युट्युब न्यूज चॅनलला आपण वकील असल्याचे प्रदर्शित करत मुलाखती देऊन माझी तसेच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे अशी दोघांची काळे – झिंजे ही बैलजोडी काँग्रेस पदाधिकारी असून चोरासारखी फेमस झाली आहे. या बैलजोडीने शहरात ब्लॅकमेलिंग व फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. हे फुकट भाजीपाला घेणे, हप्त्याची मागणी करणे, लेडीजला ब्लॅकमेल करणे, लोकांना दमदाटी करणे, व्यापाऱ्यांना त्रास देणे अशी कामे करतात. झिंजे यांना पोलीस प्रोटेक्शन आहे. हे थाटामाटात बॉडीगार्ड ठेवून पोलीस संरक्षणात लोकांची फसवणूक करतात. तर काळे हे त्यांच्या गैरकृत्यास राजकीय सपोर्ट करतात, असे बोलत आमची समाजात बदनामी केली अशी फिर्याद देत गुन्हा नोंदविला आहे.
शिंदे म्हणाले, १ ऑक्टोबरला किरण काळे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. हे सर्वांना ज्ञात आहे. त्याला पाच दिवस उलटत नाही तोच ५ तारखेला इसम नामे हर्षद चावला याने पत्रकार परिषद घेत काळेंसह झिंजे यांच्यावर धादांत खोटे, बिनबुडाचे, प्रतिमा मलिन करणारे बदनामीकारक वक्तव्य केले. आपल्या संस्कृती प्रमाणे दशक्रिया विधी, तेरावा होई पर्यंत अशा प्रकारचे कृत्य करणे योग्य नाही. मात्र कट कारस्थान करणाऱ्यांना या चुकीच्या कामासाठी दुःखाची वेळ साधण्याची दुर्बुद्धी सुचावी हे वेदना देणारे असून समाज किती खालच्या स्तराला चालला आहे हे यातून दुर्दैवाने समोर येत असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे पुढे म्हणाले, काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचा कट, षडयंत्र सातत्याने रचले जात आहे. झिंजे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याचा देखील डाव काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी केला होता. त्यातूनच त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. शहरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा एका शाळेचे मुख्याध्यापक असणारे हेरंब कुलकर्णी यांच्यावर अवैध धंद्यांच्या तक्रारीवरून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी आहे. शहरात याच कारणावरून काही महिन्यांपूर्वी हत्याकांड देखील झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ राजकीय आकसापोटी आणि अवैध धंद्यांना अटकाव करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे खोटी बदनामीकारक वक्तव्य करून समाज माध्यमांतून काँग्रेसची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे.
लढा सुरुच राहील :
अशी कितीही षडयंत्र रचली तरी शहरातील अपप्रवृत्तींच्या विरोधातील काँग्रेसचा लढा किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली असाच सुरू राहील, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन याबाबत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ निवेदन देणार आहे. दरम्यान, दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.