कर्जतमध्ये वाहतूक कोंडी, शाळा सुटताना एकाच वेळी विद्यार्थी बाहेर पडताना वाहतूक नियंत्रण करण्याची पालकांची मागणी

कर्जत (प्रतिनिधी) : दि २७ जून
कर्जत शहरात सोमवारी दुपारी ४:१५ च्या सुमारास मुख्य रस्त्यावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी जाणवली. या कालावधीत एकाच वेळी शाळा आणि विद्यालय सुटत असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग बाहेर पडतात त्यात सोमवार आठवडे बाजार असल्याने यामध्ये आणखीच भर पडली. वाहतूक कोंडी नियंत्रण करताना पोलिसांनी यश मिळवले असले तरी नागरिकांनी अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणे टाळावी अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.
कर्जत शहरात कर्जत वाहतुक पोलिसांनी आणि विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहन उभे करणे, पार्किंग करणे यांना चांगलाच लगाम घातला आहे. दररोज पोलीस वाहनांद्वारे तसेच वाहतूक पोलीस नियंत्रक कर्मचारी बाळासाहेब यादव यांनी वेळप्रसंगी अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केली आहे. मात्र तरी देखील वाहनचालक बेफिकरीने वाहन रस्त्यावर लावत वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. सोमवार, दि २७ रोजी कर्जतचा आठवडे बाजार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यातच दुपारी ४:१५ च्या सुमारास शाळा आणि विद्यालय मुख्य रस्त्यावर असल्याने सुट्टीची वेळ झाल्याने एकाच वेळी हजारो विद्यार्थीं रस्त्यावर आले असता काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. तब्बल २० ते २५ मिनिटे ईदगाह मैदान ते भांडेवाडी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कर्जत पोलिसांनी वाहतूक कोंडी निवळण्यास तात्काळ यश मिळवले असले तरी वाहन चालकांनी आपली वाहने व्यवस्थित पार्किंग करीत पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची मागणी विद्यार्थी पालकांमधून पुढे येत आहे.
**** दोरीच्या बाहेर गाडी दिसली की दंड झाला म्हणून समजा….
कर्जत शहरात मुख्य रस्त्यावर पोनि चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक कोंडीला लगाम घालण्यासाठी दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी उभी राहील अशी “यादव रेषा” टाकली आहे. त्या बाहेर कोणाचे पण वाहन उभे राहिल्यास कोणालाही न जुमानता ऑनलाइन दंड पडला म्हणून समजा. मात्र कधी-कधी वाहनचालक यास देखील जुमानत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उभी राहते.