किरण काळे झाले कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हजर ; शहर काँग्रेसच्या वतीने स्थापनादिन उत्साहात साजरा

अहमदनगर दि. 29 डिसेंबर (प्रतिनिधी) : ॲड. हर्षद चावला प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नाव चावला यांनी आपल्या फिर्यादीमध्ये घेतले आहे. तसे गुन्ह्याच्या हकिगत मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे किरण काळे स्वतःहून कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासमोर हजर झाले. यावेळी त्यांनी पोलीस तपास कामी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याबाबत पोलिसांना सुचित केले. दरम्यान, काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शहर जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा आणि त्यासाठी अहोरात्र काम करावे, असे आवाहन काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
काळे यांच्या बरोबर संजय झिंजे यांचे नाव सदर गुन्हामध्ये घेण्यात आले आहे. तेही काळे यांच्या समवेत हजर झाले. यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, अलतमश जरीवाला, गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, रतिलाल भंडारी, उषाताई भगत, जरीना पठाण, सुनीता भाकरे, विकास भिंगारदिवे, सुधीर लांडगे, विनोद दिवटे, प्रशांत जाधव, शंकर आव्हाड, गौरव घोरपडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर म्हटले की, कर नाही त्याला डर कशाला. आम्ही गुन्हा केलेला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना सातत्याने खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा शहरातील तथाकथित कार्यसम्राट नेत्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी मला खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविले. त्यातून पोलिसांनी मला तपासा अंती क क्लीन चीट दिली आहे. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यावर येथील खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासांती त्यांचे नाव पोलिसांना गुन्ह्यातून वगळावे लागले. अल्पसंख्यांक शहर काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्यावर देखील खोट्या केसेस राजकीय दबावातून करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक संजय झिंजे यांना तर जीविताला असणारा धोका लक्षात घेता बंदुधारी पोलीस संरक्षण द्यावे लागले आहे.
त्यामुळे शहरातील गुंडगिरी, दहशत, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणाऱ्या आणि विकासाचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने गोवण्याचे षडयंत्र, कटकारस्थान रचले जात आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये महाअधिवेशन गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. मात्र बुधवारी गुन्ह्यात आमची नावे आल्यामुळे नगर शहर सोडायचे नाही असा निर्णय मी घेतला. मी कुठेही पळून जाणार नाही. पोलिसांना सहकार्य करणार, असे आधीच जाहीर केले आहे. पोलिसांनी सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे एवढीच माफक अपेक्षा आहे. म्हणून नागपूरला अधिवेशनाला न जाता पोलिसांची भेट घेतली आहे. पक्ष कार्यालयामध्ये स्थापनादिन कार्यकर्त्यांशी संवाद साधत साजरा केला आहे, असे यावेळी बोलताना काळे म्हणाले.