तेलाच्या मोकळ्या डब्यापासून घरटे बनवत दिला पक्षीसंवर्धनाचा संदेश
कर्जतच्या संतोष शिंदे आणि तात्या क्षीरसागर युवकांचा अभिनव उपक्रम

कर्जत (प्रतिनिधी) दि २९ मार्च
सोशल मीडियावर तेलाच्या मोकळ्या डब्यापासून पक्ष्यांसाठी खाणे आणि पिण्याचे पाणी ठेवता येतील असे घरटे त्या दोघांनी पाहिले. त्या दोघांच्या डोक्यात एकच चक्र सुरू झाले आणि मग ती कल्पना अंमलात आणायची यासाठी कर्जत शहरातील संतोष शिंदे आणि त्याचा साथीदार तात्यासाहेब क्षीरसागर यांनी हुबेहूब तसेच घरटे तयार करीत ज्या ठिकाणी पक्ष्यांचा वावर असेल अशा झाडांवर ठेवत रोज नित्यनियमाने त्या ठिकाणी धान्य आणि पिण्याचे पाणी ठेवत एक उत्कृष्ट उपक्रम राबविला. दोन वर्षात या दोघांनी तब्बल १५० घरटे बनवले.
कर्जत शहरातील संतोष शिंदे आणि तात्यासाहेब क्षीरसागर या दोन युवकांनी सोशल मीडियावर तेलाच्या मोकळ्या डब्यापासून पक्ष्यांसाठी दाणे आणि पिण्याचे पाणी ठेवणारे घरटे बनविण्याच्या व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी हीच कल्पना आपल्या शहरात राबवायची आणि असेच घरटे आपण स्वता बनवत ज्या ठिकाणी पक्ष्यांचा स्वछंद वावर असेल त्या ठिकाणी लावत त्यात दररोज धान्य आणि पिण्याचे पाणी ठेवायचे असा चंग बांधला. प्रथमता दोघानी घरातीलच दोन तेलाचे डबे घेत तो व्हिडीओ पाहत हुबेहूब तसेच घरटे बनविले. दोघाचा आनंद गगनात मावत नव्हता. ते दोन्ही घरटे शिंदे आणि क्षीरसागर यांनी शहरातील नागेश्वर मंदिराच्या परिसरात एका लिंबाच्या झाडाला दोरीने बांधत टांगून त्यात धान्य आणि पिण्यासाठी पाणी ठेवले. काही वेळातच चिमणी, साळुंकी, कावळे यासह आणखी लहान-सहान पक्षी दाणे टिपण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी त्या घरट्याकडे येऊ लागले. दाणे टिपल्यानंतर आणि त्यातील पाणी पिल्याने त्या दोघांच्या चेहऱ्यावर आपण पक्ष्यांसाठी काही तरी केले याचे समाधान दिसू लागले.
त्यानंतर संतोष शिंदे आणि तात्या क्षीरसागर यांनी आणखी मोकळे तेलाचे डबे मिळवत मागील वर्षी ५० ते ६० घरटे बनवित ते जिल्हा परिषद शाळा, विद्यालय आणि शासकीय कार्यालयात लावत पक्षी संवर्धन उपक्रम राबविण्याचा मानस अंमलात आणला. विशेष करून उन्हाळ्यात ही घरटे चिमण्यासह इतर पक्ष्यांसाठी मोठा आधार बनत आहे. त्यांना या कामी अनेक शिक्षकांनी सहकार्य करीत ते घरटे मोफत मिळवत आपल्या शाळेत लावत हातभार दिला. यावर्षी देखील या दोघांनी रंगमय घरटे बनवत शहरातील विविध ठिकाणी ठेवण्याचा चंग बांधला आहे. नुकतेच जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत ते रंगमय घरटे नागेश्वर मंदिराच्या परिसरात लावत शुभारंभ केला आहे.
***** शिंदेचा अपघात घडला मात्र नित्यनियम करून त्याने बाहेरून रक्कम मोजुन घरटे बनविले
संतोष हा गवंडी कामगार. मागील १५ दिवसांपूर्वी तो काम करीत असताना अपघात घडला. त्याच्या हाताला इजा होऊन प्लास्टर लागले. मात्र घरटे बनविण्यासाठी त्या दोघानी काही रक्कम देत ते घरटे बनविलेच. लवकरच ती सर्व घरटे पक्ष्यांसाठी लावण्यात येईल अशी प्रतिक्रिया दोघांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली.