प्रशासकिय

जेष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 1 ऑक्टोबर ( प्रतिनिधी ):- ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
वसंत टेकडी येथे असलेल्या भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
व्यासपीठावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री क्षीरसागर, उद्योजक पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पध्दती लयास चालली आहे. आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात.समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच आई- वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अत्यंत कमी आहे. शिक्षण घेऊन आपला, आपल्या बुद्धीचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थाईक झालेल्या व आपल्या आई-वडिलांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा वेळ नसणाऱ्या पाल्यांच्या अनेक घटना आज माध्यमे, समाज माध्यमातून आपण पाहत असतो. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या या पाल्यांच्या जीवनाला कुठलाच अर्थ नसल्याचे सांगत
आपल्या आई- वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे कर्तव्य आहे. प्रत्येक मुला-मुलींनी आपल्या आई – वडिलांचा सांभाळ केल्यास, त्यांची काळजी घेतल्यास या समाजामध्ये वृद्धाश्रमाची गरजच भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. तसेच कायद्याचीही निर्मितीही केली आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यात योजनांची व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी महसूल, पोलीस प्रशासन, ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना, कायदेतज्ञ यांची येत्या दिवसात कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अहमदनगर शहरात विरंगुळा केंद्र उभारण्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी संघटनांना प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आरोग्य विभागामार्फत वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची दरमहा आरोग्य तपासणीही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त श्री देवढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी विभागामार्फत समन्वय साधण्यात येतो. वृद्धांची हेळसांड थांबून त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी शासनामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच अनुदानही देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
*ज्येष्ठ नागरिकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस*
1 ऑक्टोबर हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा वाढदिवस. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक व उपस्थितांनी जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आजच्या वाढदिवशी समाजाचे मार्गदर्शक असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद लाभले, ही माझ्यासाठी खूप भाग्याची बाब असल्याचे सांगत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी ऋणही व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या भरोसा सेल, आरोग्य विभाग,विविध संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य शिबीराद्वारे आरोग्य तपासणी करण्याबरोबरच ताणतणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे