निरपेक्ष मानव सेवेतून जालिंदर बोरुडे यांचा गौरव -ह.भ.प भास्करगिरी महाराज
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा हभप भास्करगिरीजी महाराज यांच्याहस्ते सत्कार

नगर- (प्रतिनिधी) कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता सातत्याने मानव सेवेचे व्रत सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी स्वीकारले आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदानाच्या चळवळीत मोफत दोन लाख ऑपरेशन करून अनेकांचे जीवन प्रकाशमान केले आहे. पुरस्कारासाठी काम न करता निरपेक्षपणे समाजसेवा करीत आहे निरपेक्ष सेवेतून जालिंदर बोरुडे यांना पद्मश्री पुरस्कार सारखे पुरस्कार प्राप्त होतील. असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना नवी दिल्ली येथील नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल देवगड देवस्थानचे ह.भ.प भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे,पत्रकार संजय सावंत, जिवाजी लगड,आण्णा साबळे,महेंद्र फरटणे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले की,ह.भ.प भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादामुळे सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे. समाजातील दीनदुबळ्यांना घटकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे.मोतीबिंदू शिबिरामुळे अनेकांना नवी दृष्टी मिळाली आहे.असे सांगितले.