खोडसाळपणाला समाजाने का बळी पडावे ? सध्या महाराष्ट्रात महानायकांच्या बदनामीचे जणू पेव फुटले:आर्किटेक्ट अर्शद शेख

सत्ता जेंव्हा विकास करण्यात अपयशी ठरते आणि जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करू शकत नाही त्यावेळेस जनतेला मूळ प्रश्नापासून परावृत्त करण्यासाठी भावनांचा खेळ रचला जातो. निवडणुकीच्या तोंडावर याची तीव्रता जास्तच जाणवते.
इतिहास बोध घेण्याचे सर्वोत्तम साधन आहे. महापुरुष ध्रुवतार्याप्रमाणे आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. त्यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन निस्वार्थपणे मानवसेवेसाठी अर्पित केले, म्हणून ते आमचे आदरस्थान आणि प्रेरणास्तोत्र आहेत.
ज्याप्रमाणे माशी सर्व चांगले सोडून घाणीवर बसते त्याचप्रमाणे काही मानसिक विकृतीचे लोक इतिहासात किडे काढण्याचे काम सातत्याने करीत असतात. हे मानसिक विकलागं अत्यंत नीच थराला जाऊन फक्त या महापुरूषांबद्दल अभद्र भाषा बोलत नाही तर त्यांच्या आई-वडिलांचे चारित्र्यहनन करायला देखील घाबरत नाही.
सध्या महाराष्ट्रात महानायकांच्या बदनामीचे जणू पेव फुटले आहे. कधी यांच्या निशाण्यावर महात्मा गांधी, महात्मा फुले तर कधी छत्रपती शिवाजी महाराज असतात. विकृती जरी वेगवेगळ्या असल्यात तरी प्रवृत्ती एकच आहे. हा सामाजिक कॅन्सर आहेत. याचा निषेध करण्यासाठी ‘निषेध’ शब्द देखील तोडका पडेल. किंबहुना या घटनांची तर ‘निषेध’ शब्दाला देखील लाज आली असावी.
बिनडोक, माथेफिरू, मनोरुग्ण लोकांची बेताल वक्तव्ये जी बहुउद्देशी असू शकतात. सोशल मिडीयाच्या एका क्लीप सरशी संपुर्णसमाज पेटवून उठविण्यासाठी ही मानसिक विकलांग मंडळी समाजात द्वेष, ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तरी करीत असावीत किंवा त्यांच्या एका क्लीक आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते म्हणून ते माथेफिरू ‘थ्रील’ चा अनुभव तरी घेत असतील. परंतु असो, काही कारण असले तरी या अभद्र क्रिया आमच्या हातात नाही. आमच्या हातात त्यांवर ठोस प्रतिक्रिया आहेत. या कुप्रवृत्ती ठेचण्याचे एकमात्र उपाय म्हणजे यावर कोणतेही प्रतिक्रिया न देणे एवढेच आहे. सर्व काम धंदे सोडून निषेध करावा का ? हा सुज्ञ मानसाने चिंतन करावयाचा विषय आहे. विकृतीला कोणतीच जात किंवा धर्म नसते. सडलेल्या डोक्याची माणसे सर्वत्र उपलब्ध असतात.
व्यक्ति म्हणजे समाज नव्हे. व्यक्तिगत क्रूरत्यास समाज जबाबदार नसतो. समाजाची संमती किंवा समर्थन नसलेले विषय व्यक्तिगत असतात म्हणून याला जातीय किंवा धार्मिक रंग देणे उचित नाही. तसेच काही झाले तरी धर्म कधीच धोक्यात येत नाही. धर्म अमर विचारधारेचे नाव आहे. ‘खतरेमे’ व्यक्तीचे राजकारण येते, त्याचा स्वार्थ येत असतो. त्याला सामाजिक स्वरूप देऊन तो त्याचा व्यक्तिगत स्वार्थ साध्य करीत असतो. म्हणून सुज्ञ समाजाने व्यक्तिगत अपराधाला सामाजिक स्वरूप न दिल्यास सहजीवन सुसह्य होते.
निश्चितच आपल्या दैवतांचा अपमान आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे, दु:खाचे कारण आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की महापुरुष म्हणतात कोणाला? जी व्यक्ती स्थळ, काळ, जात-धर्म तसेच मान अपमानाच्या मर्यादापलीकडे गेलेली असते त्यांना महामानव म्हणतात. ते आदराच्या आणि प्रेरणेच्या त्या शिखरावर पोहचलेले असतात जेथे त्यांची प्रशंसा किंवा अपमान गौण होतात. त्यांचे व्यक्तित्व विचार बनतात ते समस्त मानवजातीसाठी आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मूर्ख व्यक्तीच्या खोडसाळपणाला प्रतिक्रियेत संपूर्ण समाजाने आत्मक्लेश किंवा आक्रोश करावा का हा चिंतनाचा विषय आहे. म्हणुन त्याची दखल न घेणे, त्याच्याकडे कडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. जेव्ढ्या प्रमाणात याची दखल घेतली जाईल तेवढ्या प्रमाणात या अधिक बोकाळतील. आपण पोलीस प्रशासनाला यांच्या मुसक्या आवळण्यासाठी बाद्य करणे गरजेचे आहे.
विकासासाठी स्थर्य, शांती आणि सौहार्द अनिवार्य आहे. अस्थिर, अशांत आणि आणीबाणीच्या परिस्थितीत विकास होऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी सामाजिक सदभावनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपण महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे पाईक आहोत. संत महात्माने आम्हाला पुरोगामी परंपरेचा वारसा दिला. फुले-शाहू-आंबेडकरांनी आम्हाला प्रगतीवाद शिकविला. आम्हाला छत्रपती शिवरायांचे मावळे होण्याचा सार्थ अभिमान आहे. सर्व महापुरुष आमचे आदरस्थान आणि प्रेरणास्थान आहेत. आम्ही फक्त त्यांचे अनुयायी किंवा मावळे नसून त्यांच्या आदर्शाचे आणि विचारांचे वारसदार आहोत, वाहक आहोत. काही अविचारी, अविवेकी आणि मुर्ख लोकांच्या खोडसाळ क्रियेस आत्मक्लेश किंवा आक्रोशाने प्रतिसाद न देता त्यांच्या विचारांच्या ‘जागराने’ सडेतोड प्रत्युत्युर देणे अधिक उचित ठरेल. त्याच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे आपले आद्य कर्तव्य आहे. तर या, करू या जागर ‘महामानवांच्या विचारांचे !
आम्ही आमच्या प्रबोधनातून या जागराची सुरुवात केलेली आहे. माझ्या ‘इस्लाम’ या पुस्तकात एक स्वतंत्र्य अध्याय संत, महात्मा आणि छत्रपती शिवराया विषयी आहे. अगदी मशिदीच्या प्रबोधनातून आम्ही सातत्याने याची मांडणी करीत आहोत. या ! आपण सर्वजण मिळून जागर करूया आपल्या महानायकांच्या आदर्श विचारांचे ! जागर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे !
मैं अकेला ही चला था जानीब-ए-मंज़िल मगर,
लोग मिलते गए कारवाँ बनता गया