शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांना राज्यस्तरीय आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार जाहीर
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल

अहमदनगर दि.20 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- उपक्रमशील शिक्षक तथा शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठविणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ आणि सत्यजित महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार बाबासाहेब पांडुरंग बोडखे यांंना जाहीर करण्यात आला आहे.
बाबासाहेब बोडखे. हे पंडित नेहरू हिंदी विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. सलग दोन टर्म मध्ये ते माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक निवडून आले आहेत. कोरोना काळात धुणी- भांडी करणाऱ्या महिलांना अन्नधान्य व किराणा देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या दृष्टीने भाजीपाला व्यवसायिकांना स्वखर्चाने मास्क आणि हंँडग्लोव्हज पुरवले. कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या सोप्या भाषेत स्वाध्याय पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना वाटप केल्या. कोरोनात पालकत्व गमावणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवत उच्च शिक्षण होईपर्यंत निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी त्यांनी एक टेम्पोभरून धान्य व सुमारे 65 हजार रुपयाचे शैक्षणिक साहीत्य दिले होते.
गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. वंचित, मुकबधीर, मनोविकलांग, निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना सातत्याने आधार देण्याचे काम करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 5 सायकल दिल्या. दरवर्षी ते दिव्यांग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे, अन्नधान्य आणि किराणा वाटप करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख व प्रदेश कार्याध्यक्ष श्याम कांबळे यांनी दिली.
नगर-जामखेड रोड, सांडवा फाटा येथे 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले व पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते बोडखे यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार संजय शिंदे, कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोडखे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.