प्रोफेसर कॉलनी चौक नियोजित व्यापारी संकुलाचे नेहरू मार्केट होऊ देणार नाही – किरण काळे आधी टेंडर काढा, चांगला ठेकेदार नेमा, वर्क ऑर्डर द्या, मगच बुलडोजर – काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, मनपा आयुक्तांची घेणार भेट

अहमदनगर (प्रतिनिधी ): सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक हा व्यवसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. या ठिकाणी मनपाची जागा असून त्यावर मनपाने गाळे उभारलेले आहेत. नुकत्याच लागलेला कोर्टाच्या निकालानंतर मात्र मनपा प्रशासनाची या गाळ्यांना बुलडोजर लावून जमिनोदोस्त करण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. काँग्रेसने या लगीनघाईला तीव्र विरोध केला असून आक्रमक पवित्र घेतला आहे. आधी निधीची तरतूद करा, टेंडर काढा, चांगला ठेकेदार नेमा, वर्क ऑर्डर द्या, मगच बुलडोझर लावा. अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल. असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. प्रोफेसर कॉलनी चौक नियोजित व्यापारी संकुलाचे कोणत्याही परिस्थितीत नेहरू मार्केट होऊ देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी ४५ गाळ्यांचे बांधकाम मनपाने केले होते. यासंदर्भात गाळेधारकांनी मनपाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयामध्ये गाळेधारकांना अपेक्षित कौल दुर्दैवाने मिळालेला नाही. आपली बाजू मांडण्यामध्ये गाळेधारक कमी पडल्याने मनपाने याचा गैरफायदा घेतला आहे. या नियोजित व्यापारी संकुलाच्या मुद्द्यावरून काँग्रेस माञ आक्रमक झाली आहे. काँग्रेसने गाळेधारकांची पाठराखण करीत मनपा समोर महत्त्वपूर्ण मागण्या उपस्थित केल्या आहेत.
याबाबत काळे यांनी म्हटले आहे की, गाळे पाडण्याची मनपाची लगीनघाई ही या गाळ्यांमधून मिळणाऱ्या व्यावसायिक लाभासाठी आणि पडद्याडून यामध्ये आर्थिक हितसंबंध बाळगणाऱ्या राजकीय मंडळींच्या संगनमतातून सुरु आहे. यापूर्वी रात्रीतून नेहरू मार्केट सारखी ऐतिहासिक वास्तू जमिनोधोस्त केली गेली. मनपाने स्वतः ती विकसित तर केली नाहीच मात्र कोट्याधी रुपयांची असणारी ही जागा कुणाला किती गाळे वाटून घ्यायचे यावर दरोडा घालू इच्छिणाऱ्या राजकीय पुढार्यांमध्ये एकमत न झाल्यामुळे आणि मनपाच्या दयनीय अवस्थे व राजकीय अतिरिक्त हस्तक्षेपामुळे ठेकेदार न मिळाल्यामुळे आजही ओसाड पडून आहे. यामुळे या ठिकाणी पूर्वी व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यवसायिक आजही उघड्यावर आहेत.
तीच परिस्थिती दिल्ली गेटच्या गाळेधारकांची, शरण मार्केटची देखील आहे. प्रोफेसर चौकातील नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून आजही रखडलेले आहे. मनपाला आणि मनपाचे नेतृत्व करणाऱ्यांना इतक्या वर्षांपासून साधी ही कामे पूर्ण करता आलेली नाहीत. त्यांनी लावलेल्या या पाडापाडीच्या विशेष मोहिमेबद्दल यांना भारतरत्न दिला तरी तो यांचा कमीच सन्मान ठरेल. अशी बोचरी टीका करत काळे यांनी म्हटले आहे की, मनपाचा रात्रीतून या गाळ्यांना बुलडोझर लावण्याचा डाव शिजत आहे. या ठिकाणी केवळ गाळेधारकच नसून नागरिकांच्या चौपाटी देखील विकसित झालेली आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळालेला असून नागरिकांची देखील सोय झालेली आहे.
*नवीन संकुल विकसित करत असताना काँग्रेसच्या ११ प्रमुख मागण्या असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने केलेला मागण्या पुढील प्रमाणे :
१) आत्ताच्या सर्व गाळेधारकांना ग्राउंड फ्लोअरला गाळे देत त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात यावे. हे गाळेधारक गेली २५-३० वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत असल्यामुळे आणि त्यांचे पुनर्वसन होणे अपेक्षित असल्यामुळे त्यांना अल्पदरात गाळे देण्यात यावेत.
२) या जागेमध्ये चौपाटीच्या माध्यमातून हातगाडी व छोट्या स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी स्वतंत्र विभाग करून देत त्यांना अल्पदरामध्ये व्यवसायाची संधी द्यावी.
३) या चौकात आणि परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी, फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र भाजी फळ मार्केट विभाग या संकुलात निर्माण करुन त्यांना अल्पदरामध्ये व्यवसायाची संधी द्यावी. तशी लेखी हमी गाळे पाडण्यापूर्वी जुन्या गाळेधारकांना, चौपाटीतील व्यावसायिकांना व भाजी – फळ विक्रेत्यांना मनपाने द्यावी.
४) राखी पौर्णिमा, गणेशोत्सव अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळेला अनेक हातावर पोट भरणारे विक्रेते या ठिकाणी स्टॉल्स लावत असतात. त्यांच्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात यावी.
५) उर्वरित व्यावसायिक गाळे विकताना ते आजच्या बाजारभावाप्रमाणे भाडेतत्त्वावर देत त्यातून मनपासाठी मोठे उत्पन्न मिळेल असे नियोजन करावे. तुम्ही रकमेचा ते उपलब्ध करून देत मनपाचे आणि पर्यायाने शहराचे नुकसान करू नये.
६) सदर गाळे व्यावसायिकांना देण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी. ज्या पद्धतीने म्हाडा लॉटरी पद्धतीचा अवलंब करून पारदर्शक मोहीम राबविते त्याचा अवलंब करावा. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आजी-माजी नगरसेवक, एजंट तसेच काँग्रेससह कोणत्याही राजकीय पुढार्यांना येथे किंचितही हस्तक्षेप करू देऊ नये.
७) संकुलाची बिल्डिंग उभारत असताना जास्तीत जास्त व्यावसायिक उत्पन्न निर्माण होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त बांधकाम करण्यासाठीचा शासन नियमांच्या अधीन राहून आराखडा तयार करण्यात यावा.
८) हा आराखडा तयार करत असताना देखणी वास्तु उभी करणे, त्याला पुण्या – मुंबईच्या धर्तीवर मॉलचे स्वरूप देणे, या बाबींचा अंतर्भाव करण्यात यावा.
९) या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची रस्त्यांवर गर्दी होऊ नये यासाठी दोन बेसमेंट तयार करत भव्य पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
१०) महिला – पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे प्रत्येक मजल्यावर उभारण्यात यावीत. लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी.
११) संकुलाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी देशातील नावाजलेल्या दर्जेदार व सर्वोत्तम ठेकेदाराला काम देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत राजकीय पुढार्यांच्या बगलबच्चांना काम देऊ नये. यात एकही रुपयांचा भ्रष्टाचार कोणी करणार नाही आणि नगर शहरात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांप्रमाणे या संकुलाचे निकृष्ट काम होणार नाही याची दक्षता घ्यावी.
दरम्यान, या संदर्भात शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ किरण कळेंच्या नेतृत्वाखाली लवकरच मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड यांनी म्हटले आहे.