स्व.अनिलभैय्या राठोडांनी सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून नगरकरांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले : किरण काळे शहर काँग्रेस तर्फे शिवालयात अभिवादन

अहमदनगर ५ऑगस्ट (प्रतिनिधी): स्व. अनिलभैय्या राठोड हे लोकनेते होते. त्यांच्याभोवती कायम नगरकरांचा गोतावळा असायचा. नगर शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून ते व्यापारी, उद्योजकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलं होतं. सर्व समाजांमध्ये ते लोकप्रिय होते. सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून नगरकरांच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं होतं, असं प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
स्व. राठोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवालय याठिकाणी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे यांच्यासह युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, काँग्रेसच्या औद्योगिक व व्यापार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, काँग्रेस केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, कामगार आघाडीचे सुनील भिंगारदिवे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर राजेंद्र तरटे दीपक काकडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी राबवायची असते. सत्तेतून सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा असतो. दिवंगत अनिलभैय्यांनी सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाला कायम न्याय मिळवून देण्यासाठी केला. कोणीही त्यांना फोन केला तर ते तातडीने त्या ठिकाणी पोहोचायचे. मोबाईल आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. जनतेने मोबाईल आमदार म्हणून दिलेला किताब मिळवणारे ते एकमेव आमदार होते.
त्यांच्या शिवालयाची दारे समाजातल्या प्रत्येक घटकातील माणसांसाठी, गोरगरिबांसाठी कायम उघडी असायची. त्यांच्या कार्यालयात जाताना दडपण वाटायचे नाही. भेटीसाठी कुण्या मध्यस्थाची आवश्यकता असायची नाही. त्यांनी कधी कुणावर अन्याय केला नाही. कुणाला त्रास दिला नाही. त्यांची अकाली एक्झिट ही आजही मनाला चटका लावणारी आहे. स्व.अनिलभैय्या यांचे विचार जपण्याचे काम मी आणि शहरातील काँग्रेस पक्ष करत आला असून पुढील काळातही त्याच मार्गावर आम्ही कायम चालत राहू, असे प्रतिपादन यावेळी किरण काळे यांनी केले.