सातव्या मॉडर्न पेन्टाथलॉन राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत भिंगारचा ओंकार रासकर सुवर्णपदकाचा मानकरी

अहमदनगर दि.१३ जुलै (प्रतिनिधी) – वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात सातव्या मॉडर्न पेन्टाथलॉन राष्ट्रीय लेझर रन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. ही स्पर्धा मॉडर्न पेन्टाथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व मॉडर्न पेन्टाथलॉन असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न पेन्टाथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या स्पर्धेत विविध राज्यांतून विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यामध्ये 9 वर्षे वयोगटात ओंकार निलेश रासकर हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या मॉडर्न पेन्टाथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा संध्या पालीकर, माजी अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, नोडल ऑफिसर निलेश नाईक, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस, तसेच नगर असोसिएशनचे विवेक सूर्यवंशी, प्रदीप पाटोळे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
ओंकार निलेश रासकर हा स्पोर्टस् क्लब ऑफ भिंगार सबका क्लबचा खेळाडू असून, सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल त्याचे मुख्य प्रशिक्षक विठ्ठल काळे, वडील निलेश रासकर, आई सारिका रासकर, आजी द्वारकाबाई रासकर, आजोबा बाळासाहेब रासकर यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.