नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा मी आत्मदहन करेल ; काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या इशाऱ्याने खळबळ

अहमदनगर दि. ९ मे (प्रतिनिधी) : मनपाच्या बांधकाम विभागातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरण समोर आले आहे. त्यावरून शहर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शिष्टमंडळासह उपायुक्त यशवंत डांगेंची भेट घेऊन रस्त्यांची निकृष्ट कामे करत नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर पंधरा दिवसांच्या आत फौजदारी गुन्हे दाखल करा, असे म्हणत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी चांगलेच धारेवर धरले. गुन्हे दाखल न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता मी आत्मदहन करेल, असा काळेंनी आयुक्तांना लेखी इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनपाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. काँग्रेस ही कीड साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे काळेंनी म्हटले आहे. आयुक्त पंकज जावळे बैठकी निमित्त मुंबईला गेले असल्यामुळे उपायुक्त डांगेंना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, अभिनय गायकवाड, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, इंजि. सुजित क्षेत्रे, मनसुख संचेती, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, गणेश आप रे, उषाताई भगत, शैलाताई लांडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळे म्हणाले की, सन २०१६ ते २०२० दरम्यानच्या काळातील कामांचे सुमारे ७७८ टेस्ट रिपोर्ट, ८६ थर्ड पार्टी रिपोर्ट मनपाने माहिती अधिकारात दिले आहेत. मात्र शासकीय तंत्रनिकेतने एकही थर्ड पार्टी रिपोर्ट दिला नसून फक्त ३२९ टेस्ट रिपोर्ट दिले आहेत. त्यामुळे ४४९ टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. रस्ते, गटारीच्या कामांवर या चार वर्षांच्या कालावधीत मनपा फंड, जिल्हा नियोजन समिती निधी, केंद्र व राज्य सरकार निधी, खासदार, आमदार निधी यातून सुमारे ₹ २०० कोटींहून अधिक रक्कमेची बिले भ्रष्टाचार करत ठेकेदारांना अदा करण्यात आली आहेत.
काँग्रेसने मुंबईच्या आझाद मैदानात रस्त्यांसाठी उपोषण केले. आसूड मोर्चा काढला. त्यात कार्यकर्त्यांवर राजकीय दबावातून गुन्हे दाखल झाले. त्याची काँग्रेस पर्वा करत नाही. मात्र सामान्य नगरकर रस्ते द्या म्हणत टाहो फोडून वैतागले. पण रस्ते नेमके कुठे गायब झाले, हे बनावट रिपोर्ट प्रकरणातून समोर आले आहे. ३२९ उपलब्ध असणारे रिपोर्ट देखील संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष गुणवत्ता न तपासता संगनमत करत दिले आहेत. त्यामुळे निकृष्ट कामे करत नागरिकांच्या कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार मनपा अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांनी राजकीय वरदहस्तातून केला असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
काळे म्हणाले, मनपाच्या तिजोरीच्या चाव्या मतदारांनी नगरसेवकांच्या हातात दिल्या आहेत. त्यांचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे, हे सर्वांना माहीत आहे. महासभा, स्थायी समिती सभेत गोंधळ घालणारे रस्त्यांच्या कामात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना मूग गिळून गप्प का बसले होते ? कामांचे नारळ फोडत फोटोसेशन करणारे लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांनी या महाघोटाळ्याला विरोध का केला नाही ? राजकीय संगनमत व वरदहस्ता शिवाय अधिकारी एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकत नाहीत. जनता सुज्ञ आहे. अशा लोकप्रतिनिधींना ते पुन्हा कदापी निवडून देणार नाहीत.
या बाबींची व्हावी चौकशी :
# तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्या वैयक्तिक संपत्तीची चौकशी करा.
# या प्रकरणाची सखोल चौकशी करत चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा.
# बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यात सर्व सहभागींचा शोध घ्या.
# या कलावधीत काम केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका.
# निकृष्ट काम करून लाटलेल्या बिलांची रक्कम संबंधित अधिकारी, ठेकेदारांकडून वसूल करा.
# या घोटाळ्यातील सहभागी ठेकेदारांकडे सध्या असणाऱ्या वर्क ऑर्डर तातडीने रद्द करा. अदा करणे बाकी असणारी देयके रोखून धरा.
# चालू टर्म व मागील तीन पंचवार्षिक कालावधीतील सर्व टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट यांची पडताळणी करावी, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील देण्यात आली आहे.