ना.गडकरी साहेब आपण पाथर्डी – शेवगाव तालुक्यात येताना नगर – पाथर्डी प्रवास फक्त चारचाकी वाहनानेच करून प्रवासी व वाहनधारकांचे होत असलेले हाल व प्रवासातील जीवघेणा थरार प्रत्यक्ष मंत्रीमहोदयांनी अनुभवावा मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांची ना.गडकरी यांना पत्राद्वारे मागणी

पाथर्डी दि. २५ मे (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातून
जात असलेला कल्याण – निर्मल राष्ट्रिय महमार्ग क्र.६१ हा मागील सहा वर्षापासुन रखडल्यामुळे या मार्गावरील मेहेकरी – करंजी – पाथर्डी ते फुंदेटाकळी या ६० कीमी मार्गावरील प्रवास हा प्रवासी व वाहनधारकांना नरक यातना देणारा ठरला असुन सुमारे ३०० च्या वर जीव घेणाऱ्या या रस्त्यापायी जिल्ह्यातील -तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी सोबतच केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या विरोधातही प्रवासी, वाहन चालकांच्या भावनांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.
या पार्शवभूमीवर ना.गडकरी हे सोमवार दि.३० मे रोजी पाथर्डी-शेवगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार असून त्यांनी तालुक्यात येताना किमान वरील ६० किमी प्रवास हा त्यांच्याच मंत्रालयाच्या माध्यमातुन होत असलेल्या नगर – पाथर्डी या मार्गावरून चारचाकी वाहनांनेच करावा अशी मागणी पाथर्डी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी ना.गडकरी यांनाच ई मेल व्दारे केली आहे..
ना.गडकरी यांचा कार्यसम्राट असा उल्लेख या पत्रामध्ये करून संतोष जिरेसळ यांनी या महामार्गाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या कामाचा समाचर घेताना लिहिले आहे की
महोदय….. आपण पाथर्डी – शेवगाव तालुक्याच्या सीमेवरील एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढील आठवड्यात पाथर्डी – शेवगाव तालुक्यामध्ये येत असल्याचे समजले.
आपल्या येण्यामुळे मागील सहा वर्षांपासून आम्ही पाथर्डी – नगर रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी,वाहनधारक,व्यवसायिक वाहन धारक,ट्रॅव्हलर्स व अगदी आपल्या लाल परीचे ड्रायव्हर-प्रवासी सुद्धा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण जवळ आला की काय असेच या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या समस्त प्रवासी वर्गाला वाटते आहे.
आपल्या माध्यमातून साकार होत असलेल्या मुंबई -दिल्ली एक्सप्रेस वे चा एक व्हिडिओ नुकताच पाहण्यात आला ज्यामध्ये आपण एका वाहनात बसून या महामार्गावर सुमारे १६० ते १७० किमी प्रति तास वेगाने वाहन चालत असतानासुद्धा त्यामध्ये एक पाण्याचा ग्लास ठेवून त्या ग्लास मधील पाणी हलत किंवा सांडत नसल्याचे आम्हाला दाखवले.असो…
महोदय,आम्ही नगर- पाथर्डी या महामार्गावरून प्रवास करणारे सर्व प्रवासीधारक,त्रस्त पाथर्डीकर आपल्या माध्यमातून साकारत..? असलेल्या या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या पाथर्डी,-नगर या महामार्गाच्या माध्यमातून आम्हाला पाथर्डी तालुक्या मध्ये येणाऱ्या काळात सुबत्तेची मोठे मोठे स्वप्ने दाखवून सुरु असलेल्या या पाथर्डी – निर्मल महामृत्युमार्गाचे शिकार झालेले आहोत.पाथर्डी चे भूमीपुत्र तथा ज्येष्ठ अभियंता मा.सी.डी.फकीर साहेब यांनी या कायम दुष्काळी भागाला हा महामार्ग प्रगतीकडे घेऊन जाईल ही भाबडी आशा बाळगून स्वतःचे सर्व कसब व प्रतिष्ठा पणाला लावून कल्याण – नगर – पाथर्डी- परभणी – नांदेड ते निर्मल असा जवळचा मार्ग आखला व त्याची मंजुरी घेऊन सहा वर्षापूर्वी कामही सुरू झाले,आम्हाला तर या महामार्गामुळे खरंच आम्ही कायम दुष्काळी लोक प्रगतीशील झालोत अशी दिवसाढवळ्या स्वप्ने पडू लागली.महामार्गावर येणाऱ्या प्रत्येक गाव कट्ट्यावरही गावच्या भावी प्रगतीच्याच चर्चा झडू लागल्या.भरपूर मोठा महामार्ग,त्याच्या मधोमध रंगीबिरंगी फुलझाडांनी बहरलेला रस्ता दुभाजक,आजूबाजूच्या गावांना जाणाऱ्या रस्त्यावरही सर्विस रोड -भुयारी मार्ग,या महामार्गावरून जाणाऱ्या भन्नाट गाड्या अशा स्वप्नांची इमले गावोगावी रचली जाऊ लागली.मग काय,महामार्ग शेजारी कुणी हॉटेल साठी जागा शोधू लागले तर कुणी पेट्रोलपंप,शॉपिंग मॉल,वाहन स्पेअर पार्ट आदींसाठी.पण हाय रे किस्मत…. सगळ्या स्वप्नांचा सत्यानाश झाला..
मागील सहा वर्षापासून सुरू असलेल्या,नव्हे तर रडतखडत काम होत असलेल्या या महामार्गाचे रूपांतर आता मात्र भीषण वेदनादायी अश्या महामृत्युमार्ग मध्ये झाले आहे.नगर जवळील चांदबिबी महाल ( मेहकरी ) ते पाथर्डी – फुंदे टाकळी या सुमारे ६० किमी मार्गावर वाहने चालवताना वाहनधारकांना आपण चंद्रावर किंवा मंगळ ग्रहावर तर वाहने चालवत नाहीत ना..? असा प्रश्न पडतो आहे.गुडघाभर पडलेल्या खड्डेरुपी विवरांमधून वाहने चालवताना समस्त प्रवासी,वाहन चालक नव्हे तर खुद्द वाहने सुद्धा या महामृत्युमार्गाच्या दुर्दशा बद्दल आपणास व आपल्या मंत्रालयाला शिव्यांची लाखोली वाहिल्याशिवाय प्रवास पूर्ण करतच नाहीत.या ६० की मी मार्गावर आदळत-आपटत प्रवास करताना समस्त प्रवासी धारकांचीच नव्हे वाहनांचेही मनके सडकून ढिले झाल्यावाचून राहत नाही.ज्या पाथर्डी – नगर प्रवासासाठी आम्हाला या अगोदरचा साध्या राज्यमार्गाने फार तर ५० ते ६० मिनिटे लागायची त्याच प्रवासासाठी आता आपल्या महामार्गामुळे तब्बल दोन तासही अपुरे पडत आहेत.ज्या पेट्रोल – डिझेल ला वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहात त्या प्रयत्नाला सुरुंग लावण्याचे काम हा महामृत्युमार्ग करीत आहे.या ६० किमी महामृत्युमार्गाच्या दुर्दशेमुळे वाहने आदळत-आपटत प्रवास करत असल्यामुळे आतापर्यंत अब्जावधी रुपयांचे पेट्रोल-डिझेल वाया गेल्यामुळे आपल्या परकीय चलनाचेही प्रचंड मोठे नुकसान होत आहे.
अनेक प्रवासी व वाहनांचे नुकसान केलेल्या या महामृत्यु मार्गाने आजपर्यंत सुमारे तीनशे चा वर जीव घेतले नव्हे तर ३०० च्यावर कुटुंबे उध्वस्त केली आहेत,शेकडो प्रवासी कायमचे अपंग झाले आहेत.
या महामृत्युमार्गाचे काम पूर्ण करावे,हकनाक बळी जाणारे जीव वाचावेत यासाठी पाथर्डी तालुक्यातील या महामृत्युमार्गावरील प्रत्येक गावात अनेक आंदोलने झाली,आपल्या अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी रस्ता लवकरच पूर्ण होईल यासाठी शेकडो खोटी आश्वासने देऊन आंदोलकांची बोळवण केली,मनसेच्या वतीने आम्ही आपल्या महामार्गाच्या पाथर्डी कार्यालयात अधिकारी फक्त आर्थिक व्यवहारासाठी येतात अन्यथा तिथे कोणी फिरकत नसते याचा निषेध म्हणून कार्यालयावर “हल्ला बोल” आंदोलन केले,सरतेशेवटी आपणच आम्हाला या मृत्यूच्या सापळ्यातून वाचावावे म्हणून आपली पाथर्डी शहरातील स्व.वसंतराव नाईक पुतळ्याजवळ”पाद्यपूजा” देखील केली,परंतु ठेकेदार बदलणे या व्यतिरिक्त आम्हा पाथर्डीकरांच्या पदरात काही पडले नाही.कोणीही येवो,काम शून्यच….
या ६० किमी महामृत्युमार्गाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत जेवढी आंदोलने झाली हे सुद्धा एक प्रकारचे”आंदोलनाचे रेकॉर्ड” झाले असेल.
आपण एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यात येत असल्याचे समजले,त्यामुळे आम्ही समस्त त्रस्त पाथर्डीकर आपणास या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहोत कि आपण तालुक्यात येताना आपले हेलिकॉप्टर नगर येथे सोडून नगर -पाथर्डी-फुंदे टाकळी फाटा ते बोधेगाव असा प्रवास फक्त चार चाकी वाहनातूनच करावा,मुंबई दिल्ली एक्स्प्रेस मार्गावर प्रवास करत असताना जो पाण्याचा ग्लास आपल्या गाडीत ठेवला होता व त्यातील पाणी हलत किंवा सांडत नाही हे आम्हास दाखवले होते त्याच ग्लासातील पाणी आपण या महामार्गावरून प्रवास करताना पाणी न सांडता फक्त पिऊन दाखवावे,जर असे झाले तर मात्र आपण हा महामृत्यूमार्ग किती अप्रतिम…? बनवत आहात हे आपोआप सिद्ध होईल.खरेतर आपण पाथर्डी तालुक्यात येत आहात तेव्हा या महामृत्युमार्गाच्या कारभाराची आपणास कल्पना यावी म्हणून आम्ही आपणास “काळे झेंडे दाखवा” असे आंदोलन करण्याचे ठरवले होते,परंतु या आंदोलनाची वेगळ्या प्रकारची चर्चा होऊन कदाचित आपण या तालुक्यात येण्याचे टाळले असते व आपण येथे येणे टाळू नये उलटपक्षी या मार्गावरूनच आपण प्रवास करावा यासाठी आम्ही असे आंदोलन करणे थांबवत आहोत.
आपण आम्हा पाथर्डीकरांच्या नव्हे तर सर्व प्रवासी धारकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाथर्डी तालुक्यात येत असताना नगर-पाथर्डी असा प्रवास फक्त चार चाकी वाहननेच करावा त्यानंतर आपणास इतर काही सांगण्याची किंवा तक्रार करण्याची आम्हाला आवश्यकता नाही हे आपोआप सिद्ध होईल….
कळावे..
या महामार्गाच्या सद्यस्थतीवर परखड भाष्य करणाऱ्या या पत्राची दखल घेऊन ना.गडकरी यांनी एकदा या मार्गावरूनच प्रवास करावा अशी मागणी नागरीकांकडून्ही केली जात आहे, या मागणीची दखल घेऊन ना.गडकरी काय भुमिका घेणार हा ऑस्तुक्याचा विषय होणार आहे.