बोल्हेगाव, सावेडी परिसरातील युवकांचा किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश ; युवक काँग्रेस करणार युवा स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

अहमदनगर दि. १७ एप्रिल (प्रतिनिधी) : शहर काँग्रेसमध्ये इन्कमिंगचा सिलसिला सुरूच आहे. नगर शहरातील युवकांना दिशा देण्याची क्षमता आणि ताकद शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वात आहे. त्यांचा निर्भीड बाणा आणि विकासाचे व्हिजन यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होऊन प्रवेश करत असल्याचे म्हणत बोल्हेगाव, सावेडी परिसरातील युवकांनी युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट यांच्या पुढाकारातून काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चितळे रोड वरील शिवनेरी कार्यालयात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
प्रणव मकसरे यांच्यासह सिद्धार्थ चौधरी, सुनील रोकडे, अक्षय धाडगे, सुचित उघाडे, कुणाल उजागरे, श्लोक शिरोळे, अभय डोळस, हर्षल उजागरे, आर्यन कांबळे, राजू क्षेत्रे, सुरेश घोडके, राकेश पवार आदींसह युवकांनी मोठ्या संख्येने यावेळी प्रवेश केला. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंडेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेसचे आनंद जवंजाळ, बिभीषण चव्हाण आदी उपस्थित होते.
युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट म्हणाले की, मागील पस्तीस वर्षांपासून शहराचा विकास खुंटला आहे. आम्ही युवक स्व.नवनीतभाई बार्शीकर यांनी शहरात अनेक विकासाची कामे केली हे सातत्याने ऐकत आलो आहोत. मात्र बार्शीकर यांच्या नंतर शहराला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल असे सक्षम नेतृत्व या शहराला मिळाले नाही. यामुळे तरुण पिढी नैराश्यग्रस्त आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबईकडे स्थलांतर होत आहेत. किरण काळे हे उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे. नगर शहराला ‘उद्योग नगरी’ करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे या शहरातील युवकांचे बळ उभे करण्याचे काम युवक काँग्रेस करत आहे. त्याच भावनेतून युवक मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत.
चौकट :
युवक काँग्रेस युवा स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करणार :
युवक अध्यक्ष प्रवीण गीते म्हणाले की, आज शहरातील युवकांना नोकरी किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळण्याची गरज आहे. मात्र शहराचा विकास खुंटल्यामुळे नोकरी तर नाहीच त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या संधी देखील अत्यंत कमी झाल्या आहेत. शहराचा विस्तार झाल्याशिवाय या विषयाला चालना मिळणार नाही. काळे यांच्या नेतृत्वाखाली युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन लवकरच युवक काँग्रेसच्या माध्यमातून केले जाणार असून या माध्यमातून शहरातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काँग्रेस काम करणार असल्याचे गीते म्हणाले.