कृषि विदयापीठात गुजरात राज्यातील फळमाशी व्यवस्थापनाची यशोगाथा या विषयावर व्याख्यान संपन्न

राहुरी दि. ३१ (प्रतिनिधी )-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अदययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि कृषि किटकशास्त्र विभाग व वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्या संयुक्त विदयमाने नवसारी कृषि विदयापीठ, गुजरातचे कुलगुरु डॉ. झेड.पी. पटेल यांचे गुजरात राज्यातील फळमाशी व्यवस्थापनाची यशोगाथा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी.पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता कृषि शिक्षण डॉ. पी.एन. रसाळ, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस.पाटील, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. टी. के. नरुटे व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
डॉ. झेड.पी. पटेल यांनी फळमाशीबद्दल माहिती देतांना सांगितले की जगभरात फळमाशीच्या ४ हजारपेक्षा अधिक प्रजाती अस्तित्वात असुन त्यापैकी २०० पेक्षा जास्त प्रजाती भारतात आढळुन येतात. गुजरात व महाराष्ट्र राज्यात फळपिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असुन फळपिके व भाजीपाला पिकांना फळमाशा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव करतात. त्यामुळे एकंदरच पिकांची उत्पादकता, उत्पादित मालाचा दर्जा व बाजारमुल्य यावर विपरीत परिणाम होतो. गुजरातमधील सुरत, नवसारी व वलसाड या जिल्हयांत फळपिकांचे मोठे क्षेत्र असुन दक्षिण गुजरातमधून मोठया प्रमाणावर शेतीमालाची निर्यात होत असते. फळमाशीचा उद्रेकामुळे शेतमालाचे होणारे नुकसान लक्षात घेवुन डॉ. पटेल यांनी २७ वर्षांच्या प्रदिर्घ संशोधनातून नौरोजी स्टोनहाऊस फ्रुटफ्लाय ट्रॅपची निर्मिती केली. त्यामुळे मोठया प्रमाणावर किटकनाशकांवरील अंवलंबीत्व कमी करण्यात यश आले. या सापळयाकडे फळमाशा मोठया संख्येने आकर्षित होत असल्याने ते अतिशय प्रभावी ठरुन जवळपास ८५ टक्के फळमाशींचा प्रादुर्भाव कमी करता आला. आंबा पिकात त्यामुळे हेक्टरी नाममात्र रु. ३५० खर्चुन शेतकरी बंधुंना रु. ८१ हजार प्रति हेक्टरपर्यत अतिरीक्त नफा कमावता आला. सदर सापळयांचा ६ हजार हेक्टरपेक्षा जास्तक्षेत्रावर वापर होऊन ४९ कोटी रुपये इतके उत्पन्न गुजराती शेतकर्यांना कमविता आले. याच महत्वपुर्ण कार्याची दखल २०१२ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या कॉफीटेबल बुकमध्ये घेण्यात आली व मॅन ऑफ फ्रुटफ्लाय नावाने डॉ. पटेल शेतकरी बंधुंमध्ये सर्व परिचित झाले. फळमाशीबरोबरच डॉ. पटेल यांनी चिकुवरील फळे पोखरणारा पतंग व उसावरील पाकोळी या किडींवर देखील मोठे संशोधन केले आहे. अतिशय मानाचा उत्कृष्ठ संशोधन पुरस्कार गुजरातच्या मुख्यमत्र्यांच्या हस्ते त्यांना क्रॉप पेस्ट मॅप इन सॅपोटा एन्ड फ्रुट फ्लाय ट्रॅप निर्मिती या कार्याबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या द़ृष्टीने अशा पध्दतीच्या कमी खर्चिक, वापरण्यास सुलभ व पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. विदयार्थ्यांनी अशाच प्रकारे इतर किड व रोग यावर शेतकर्यांना उपयोगी संशोधन करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मका पिकावरील नवीन अमेरिकन लष्करी अळीच्या व्यवस्थापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मोठा वाव असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी.एस.पाटील यांनी केले. डॉ. टी. के. नरुटे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. डॉ. पी. आर. पाळंदे यांनी तर डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य डॉ. उदय पवार यांनी केले. व्याख्यानाच्या यशस्तीतेसाठी दोन्ही विदयाशाखांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर वृंदांनी परिश्रम घेतले.