सामाजिक

…अन्यथा रेल्वे मालधक्का कामगार प्रश्नावर किरण काळेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा ; कामगारांना सुमारे रु. ३ ते ४ कोटींचा दरवाढीसह फरक मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार

अहमदनगर दि. ७ मार्च (प्रतिनिधी) : सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष यांच्या लेखी आश्वासनानंतर दि.१७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे माल धक्क्यावरील दरवाढ प्रश्नावरून सुरू असणारे कामगारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. यावेळी एक महिन्याच्या आत दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जर हे आश्वासन विहित मुदतीत पूर्ण केले गेले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. तसेच कामगारांना त्यांच्या हक्काचा आणि घामाचा मेहनताना असणार सुमारे रु. ३ ते ४ कोटींचा दरवाढीसह फरक मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काळे यांच्या नेतृत्वाखाली माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त व माथाडी बोर्डाचे अध्यक्ष नितीन कवले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी कामगारांच्या वतीने आश्वासनाच्या अंमलबजावणी बाबतचे स्मरण पत्र देण्यात आले. यावेळी कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, बाबासाहेब वैरागर, अमर डाके आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले की, यापूर्वी देखील मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वारंवार आश्वासन देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्ती नंतर कामगारांनी संयम दाखवत पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांची फसवणूक झाली नाही पाहिजे. नुकत्याच नगर दौऱ्यावर येऊन गेलेल्या माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या समवेत देखील कामगारांची या विषयासंदर्भात बैठक झाली असून आ. थोरात यांच्यासह काँग्रेस पक्ष कामगारांच्या या लढाईत त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

विलास उबाळे, सुनिल भिंगारदिवे म्हणाले की, माथाडी कामगार हा अतोनात कष्ट करतो. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. हे काम अत्यंत कष्टप्रद स्वरूपाच आहे. मात्र दुर्दैवाने घामाचा योग्य मोबदला मिळत नाही. मात्र यावेळी काळे यांचे नेतृत्वाखाली कामगारांना दरवाढीसह त्यांचा प्रलंबित असणारा कोट्यावधी रुपयांचा फरक मिळवून देण्यासाठी निर्णायक लढाई छेडण्यात आली आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार एकजुटीने लढत असून आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी आश्वासनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर मालधक्का ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे अधिकारी कवले यांनी शिष्टमंडळास सांगितले.

फोटो ओळी :
१. रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या दरवाढ प्रश्ना संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्याशी चर्चा करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, बाबासाहेब वैरागर, अमर डाके आदी.

२. सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांच्या दरवाढ प्रश्ना संदर्भात स्मरणपत्र देऊन पुन्हा आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली देताना कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, बाबासाहेब वैरागर, अमर डाके आदी.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे