जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ७५१ कोटींचा निधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

शिर्डी, दि.५ फेब्रुवारी – (प्रतिनिधी) – केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड,पोपटराव वाणी, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कांचन मांढरे, गुलाबराव सांगळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थींना साधन साहित्याचे वितरण आणि अचानक मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुबीयांना/वारसांना मोफत अपघात विमा योजनेच्या माध्यमातून धनादेश देण्यात आले.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ग्रामीण भागात विकास साध्य करताना पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ सालापर्यत प्रत्येक घरात शुध्द आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला चालना देण्यासाठी अर्थ संकल्पात २० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने ग्रामीण भागात कृषी पूरक व्यवसायातून मोठे रोजगार निर्माण होतील. अशी अपेक्षा व्यक्त करून सेवा सहकारी सोसायट्यांना सुध्दा मल्टीर्पपजचा दर्जा देण्याचा निर्णय सहकारातून रोजगार निर्मितीला उपयुक्त करणार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
महसूल विभागाने सलोखा योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद बांधावर मिटविण्याची मोठी मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे चालणारे वाद सलोखा योजनेतून मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करतानाच दुग्ध व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राज्यात दुधाळ जनावारांच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार निर्णय करीत असून यामुळे विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वासही श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.