निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

अहमदनगर दि. 03 (प्रतिनिधी):- भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभागात विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे जिल्हयात काटेकोर पालन होईल, या दृष्टीने नियोजन करत निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवडणूक कामाकाजासाठी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
बैठकीस यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, यांचेसह सर्व उपजिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हयात एकूण 147 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली कामे जबाबदारीने व चोखपणे पार पाडावीत. कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.