सामाजिक

नगर शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाच्या रु. २०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी अँटी करप्शन केव्हा कारवाई करणारा ? : किरण काळेंचा संतप्त सवाल हे म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वराती मागून घोडे

अहमदनगर दि. 27 जून (प्रतिनिधी) : मनपातील बड्या अधिकाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कारवाई केली आहे. हे म्हणजे वराती मागून घोडे आहे. तरी देखील उशिरा का होईना पण सुचलेल्या या शहाणपणा बद्दल आम्ही विभागाच्या कारवाईचे काँग्रेसच्या वतीने स्वागत करत आहोत. विद्यमान मनपा आयुक्त यांच्यासह बांधकाम विभागातील अनेक धेंडं नगर शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. सुमारे ७०० हून अधिक बनावट कॉलिटी कंट्रोलचे खोटे टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी मी स्वतः राज्याच्या अँटी करप्शन प्रमुख विश्वास नागरे पाटील यांच्याकडे सर्व पुराव्यांसह फिर्याद दाखल केली आहे. आठ महिने उलटली तरी देखील अद्यापही यात कारवाई नाही. ही कारवाई कधी करणार, असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी विभागाला केला आहे.

काळे म्हणाले की, नगर मनपा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत यासह सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. महानगरपालिकेत अधिकारी नगरकरांना सेवा देण्यासाठी नव्हे तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी बसतात. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराच्या साखळीमध्ये केवळ अधिकारीच नाही तर अनेक राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी देखील बरबटलेले आहेत. यामुळेच नगर शहराची खड्ड्यांचे शहर, कचऱ्याचे शहर म्हणून ओळख झाली आहे. अमृत सारखी योजना कोट्यावधी रुपये खर्च करून देखील प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळा झाल्यामुळे नागरिकांना आजही दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत नाही.

या माध्यमातून शहरात मनपाची स्थापना झाल्यापासून जवळपास मागील वीस वर्षांमध्ये काही हजार कोटींचा भ्रष्टाचार शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची कामे करताना तसेच मनपा फंडातून कामे करताना झाला आहे. यासंदर्भात मी स्वतः बनावट टेस्ट रिपोर्टचे पुरावे दाखल केले आहेत. या संदर्भात वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच ताब्यात घेत आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मनपाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र जे चोऱ्या करतात ते स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार ? त्यामुळे आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणातील २०० कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळा भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात देखील अशाच पद्धतीची कारवाई करावी. त्या कारवाईचे आम्ही नगरकरांच्या वतीने जरूर स्वागत करू असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे