भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते – किरण काळे

अहमदनगर दि. ६ डिसेंबर (प्रतिनिधी) : आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापु चंदनशिवे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष पूनमताई वंनम, आशाताई लांडे, उपाध्यक्ष ज्योतीताई साठे, राणीताई पंडित, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, प्रशांत जाधव, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरज साठे, क्रीडा काँग्रेस विभागाचे अमित बडदे, समर्थ मुळे, अजय शेळके, हनीफ मोहम्मद शेख, बिबीशन चव्हाण, आदी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश समाजाला दिला. शिक्षणाच्या बाबतीत आपण पुढे आलो आहोत. मात्र आज देशामध्ये ज्या पद्धतीने देश तोडण्याच्या कृती सुरू आहेत या कृतींच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. काही लोकांना देशाच संविधान नको आहे. त्यांना धर्मा-धर्मात, जाती-जातीत तणाव निर्माण करायचा आहे.
अशा वेळी भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षतेचा दिलेला विचारच देशाचे अखंडत्व बाधित करणाऱ्यांना रोखू शकतो. त्यामुळेच संविधानाचा जागर करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. शांतता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजविघातक प्रवृत्तींपासून समाजाला वाचण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी काळे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केल्यानंतर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.