काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंच्या पक्षादेशानंतर नगरसेविका वारे, पवारांचे आयुक्तांना विरोधाचे पत्र तातडीने सादर

अहमदनगर (प्रतिनिधी ): स्मशानभूमी जमीन खरेदी घोटाळ्या बाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल पत्रकार परिषद घेत त्यांनी पक्षाच्या विरोध न करणाऱ्या नगरसेवकांना तातडीने दोन दिवसांच्या आत विरोधाची लेखी पत्र आयुक्तांना सादर करण्याचा आदेश बजाविला होता.
काळे यांच्या आदेशानंतर काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेविका रूपाली निखिल वारे, संध्या बाळासाहेब पवार यांनी आयुक्त पंकज जावळे यांना लेखी विरोधाची पत्रे कालच तातडीने सादर केली आहेत. काळे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस पक्षातील नगरसेवकांना सुद्धा यावेळी पक्षाच्या आदेशाचे पालन करावे लागले आहे.
काळे यांनी या घोटाळ्याला विरोध न करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांना उमेदवारी न देण्याची देखील घोषणा करत जाहीर तंबी काल दिली होती. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले होते. आतापर्यंत शीला चव्हाण, आसिफ सुलतान, रूपाली वारे, संध्या पवार या काँग्रेसच्या सहापैकी चार नगरसेवकांनी विरोधाची पत्रे आयुक्तांना सादर केली असून उर्वरित दोन नगरसेवक लवकरच ती पत्रे सादर करतील, अशी माहिती शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली आहे.
.