मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी मन्सूर शेख नाशिक विभागीय सचिवपदानंतर राज्याच्या कमिटीवर नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी नगरचे पत्रकार मन्सूर शेख यांची निवड झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड राहणार असून, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष शरद पाबळे यांनी मुंबईत ही घोषणा केली.
परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवडला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडीची घोषणा करण्यात आली. मन्सूरभाई शेख गेली पंचवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून ते मराठी पत्रकार परिषद, मुंबई या संघटनेशी जोडलेले आहे. काही वर्षापासून ते नाशिक विभागीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी परिषदेच्या वतीने केले जाणार्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. इतरही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे.
एक मनमिळाऊ, मितभाषी पत्रकार आणि उत्तम संघटक असलेल्या मन्सूरभाई यांचे बातम्यांचे युट्यूब चॅनल आहे. विविध दैनिकाचे प्रतिनिधीत्वही ते करतात. याशिवाय नगरमधील विविध सामाजिक संघटनांशी ते जोडले गेलेले आहेत. पत्रकार आणि समाजातील इतर घटकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांना पुरस्कार, वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वैदयकीय मदत देण्याची पद्धतही त्यांनी नगरमध्ये सुरू केली. या नियुक्तीबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.