जिल्ह्यात विकास कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करा:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (प्रतिनिधी:- जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होऊन सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, यासाठी यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनुसार निधी देण्यात येतो. या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करावीत. तसेच चालू वर्षात मंजूर असलेल्या निधीसाठीचे प्रस्ताव येत्या महिन्याभराच्या आत सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.
बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावडे, अपर जिल्हाधिकारी श्री. मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, चालू वर्षामध्ये जिल्ह्यासाठी 557 कोटी रुपयांचा नियतव्यवय मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर संपूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. अनेक विभागांनी स्पीलच्या निधीची मागणी केलेली नसून ती तातडीने करण्याबरोबरच गतवर्षातील निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रेही तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवत त्यांच्या हिताच्या योजना राबविण्याला प्राधान्य देत असुन शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. पारंपरिक शेतीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असा जोडधंदा असून जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीसाठीही अधिक प्रयत्न करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पशुधनामधील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाला पुरेशा प्रमाणात औषधी, लस तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उपलब्ध संसाधनांचा उपयोग करत जिल्ह्यात लम्पी आजारांमुळे पशुधनाची हानी होणार नाही, यादृष्टीने विभागाने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांच्या शेतीला विद्युत मोटारीच्या सहाय्याने मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी ग्रामीण भागामध्ये मुबलक व योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा, यादृष्टीने नियोजन करत वीजेच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचना करत सुलभरितीने वीजेच्या पुरवठ्यासाठी खराब झालेल्या विद्युत तारा, जीर्ण झालेले कंडक्टर आदींची तातडीने दुरुस्ती करुन घेत जिल्ह्यात सोलार पॉवरच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी उपयुक्त अशा सुचना मांडल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी, पशुसंवर्धन, वनविभाग, लघपाटबंधारे, क्रीडा विभाग, महावितरण यासह इतर विभागांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.