हमीभाव योजने अंतर्गत मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीस 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
अहमदनगर, 30 नोव्हेंबर – शासनाने मका व बाजरी या शेतमाल खरेदीसाठी शेतकरी नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली होती. त्यामध्ये शासनाने ७ डिसेंबर २०२२ पर्यंत शेतकरी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. तसेच नोंदणी झालेल्या शेतक-यांची भरडधान्य मका व बाजरी खरेदीसाठी १ नोव्हेंबर, 2022 ते ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत खरेदी कालावधी निश्चित केलेला आहे. ज्या शेतक-यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे त्या शेतक-यांनी नोंदणी करीता ७१९ उतारा, ८ अ, आधारकार्ड व बँक पासबुक किंवा रद्द चेकची छायांकीत प्रत खरेदी केंद्रावर नोंदणी करीता जमा करावी व स्वत: फोटो अपलोड करण्याकरीता उपस्थित रहाण्याचे आवाहन प्र.जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी केले आहे.
हमीभाव योजने अंतर्गत मका हमीभाव १ हजार ९६२ प्रति क्विटल व बाजरी २ हजार ३५० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. नोंदणीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी केंद्रे सुरु करण्यात आली असुन यामध्ये राहुरी तालुका खरेदी विक्री संघ, जय भगवान स्वयंरोजगार सह.संस्था, पाथर्डी, कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी, कर्जत, सुखायु अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बोधेगाव- शेवगाव, श्रीराम बि-बीयाणे उत्पादक सह.संस्था साकत-अहमदनगर, कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समिती व तुळजा युमेन्स स्टेट लेव्हल को ऑप सोसायटी, श्रीरामपुर.
सर्व शेतक-यांनी हमीभाव योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असेही पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.