“इंद्रधनुष्य युवक महोत्सव” युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ: – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य 2022 युवक महोत्सवाचे थाटात उदघाटन

अहमदनगर दि.5 (प्रतिनिधी) :- इंद्रधनुष्य युवक महोत्सवात विविध विद्यापीठातील सहभागी युवक-युवतींच्या कलागुणांच्या सर्वोत्तम प्रदर्शनातून हा युवक महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ ठरेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे “इंद्रधनुष्य-2022” च्या 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उदघाटन महसूलमंत्री तथा पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, लोणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु तथा पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. कारभारी काळे, मराठी चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे, आमदार तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य नरेंद्र दराडे, आमदार तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य किशोर दराडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय पानसरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश शिंदे, महोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रमोद पाब्रेकर, डॉ. तानाजी नरुटे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. सुनिल गोरंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, मानवी जीवनात कलेचं एक वेगळं स्थान आहे. अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. इंद्रधनुष्य 2022 या युवक महोत्सवाने युवक-युवतींना एक संधी उपलब्ध करून दिली असून या संधीचे सोनं करत स्वतः मधील अंतरंग सादर करुन आपल्या कलेचा नावलौकिक राज्यासह देशपातळीवर पोहोचवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजघडीला तरुणांवर समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव आहे. तरुणांनी समाजमाध्यमांचा अतिवापर टाळत स्वत:वर प्रेम करायला शिकले पाहिजे. जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी ध्येय निश्चिती अत्यंत आवश्यक असुन तरुणांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आतापासूनच ध्येय निश्चित करुन यशप्राप्ती प्रयत्न करावेत. कृषीक्षेत्रासह विविध क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना एक नवी ऊर्जा देण्याचे काम करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठांनी देशभरातील नामांकित अशा विद्यापीठांशी सामंजस्य करार करत कृषी क्षेत्रात येऊ घातलेल्या नवनवीन कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.
मराठी चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडून अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. ध्येयपूर्तीसाठी कुठलाही ताण न घेता निडरपणे व अत्यंत उत्साहात प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की, युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या युवक महोत्सवाच्या आयोजनाचा मान विद्यापीठाला मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम राज्यपाल महोदयांचे आभार व्यक्त केले. कलेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. युवकांनी हारजीतची तमा न बाळगता आपल्या कलागुणांचे सर्वोत्तम प्रदर्शन करावे. सीडनिर्मिती, ड्रोन प्रशिक्षण, देशी गायींचा प्रकल्प यामध्ये राहुरी विद्यापीठ देशात अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरु डॉ. कारभारी काळे म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय संस्कृती जोपासली गेली पाहिजे. जीवन जगत असताना पैसा व भौतिक सुख महत्वाचे नसुन कला ही मनाला समाधान देणारी आहे. कला हे जीवन जगण्याचे माध्यम असुन प्रत्येकाने कलेची साधना व उपासना करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्यापीठगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रधनुष्य 2022 या माहिती पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन विणा दिघे यांनी केले तर आभार डॉ. महावीर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठातील युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.