जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी ७ केंद्रे सुरू २१ ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी अर्ज भरण्यास मुदतवाढ

अहमदनगर, १३ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) खरीप हंगामामधील भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात ७ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मका १९६२ रूपये व बाजरी २३५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव शासनाने निश्चित केलेला आहे. शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. असे आवाहन महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा विपणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
तुळजा युमेन्स स्टेट लेव्हल को-ऑप सोसायटी (श्रीरामपूर), श्रीराम बि-बियाणे उत्पादन व पणन प्रक्रिया सहकारी संस्था (साकत ता. नगर), कृषी उत्पन्न बाजार समिती (कोपरगाव), जय भगवान स्वयंरोजगार सह संस्था (पाथर्डी), कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी (कर्जत), सुखायु अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (शेवगाव) आणि राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (राहुरी) ह्या संस्थांना भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी व खरेदी केंद्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे.
शेतमाल विक्री करावयाच्या शेतकऱ्यांनी नोंदणी करता फोटो काढण्यासाठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड प्रत, बॅंक खाते पासबुक प्रत, रद्द केलेला धनादेश प्रत, सध्याचा मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे नोंदणी केंद्रावर सादर करावीत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.असेही श्री.आभाळे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.