डॉ. संगीता बर्वे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार, श्रीरामपूरच्या कन्येचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार जाहीर. मराठी भाषेसाठी डॉ. संगीता राजीव बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकास २०२२ साठीचा बालसाहित्य पुरस्कार. बेलापूर (ता. श्रीरामपूर) हे बर्वे यांचे माहेर. त्या आयुर्वेद डॉक्टर आहेत. त्यांनी Masters in Ayurvedic dietetics केले आहे. मराठी विषयात एमए पदवी संपादन केली आहे.यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार आणि बहुमान मिळाले आहेत.
माहेरी असताना घरी त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि सासरी प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्यासारखी सासू लाभली. त्यामुळे त्यांचा साहित्य-संगीत या क्षेत्रांचा प्रवास सुरेल झाला. आदितीची साहसी सफर (अनुवादित गद्य), उजेडाचा गाव, खारूताई आणि सावलीबाई, गंमत झाली भारी, झाड आजोबा, रानफुले हे त्यांचे बालकवितासंग्रह. पियूची वही (रोजनिशी- बालनाटय़), संभाजीराजा, हुर्रेहुप (बालसाहित्य) अशी त्यांची साहित्यसंपदा मुलांना आजही आवडते.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. बर्वे (माहेरच्या बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे) यांचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक होते. संगीता यांना ४ थीपासूनच कागदावर शब्द उमटविण्याचा छंद लागला. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.